Devendra Fadnavis : ‘खात कुठलं हे महत्त्वाचं नाही; तर चालवणारा योग्य व्यक्ती पाहिजे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Latest News

Devendra Fadnavis : ‘खात कुठलं हे महत्त्वाचं नाही; तर चालवणारा योग्य व्यक्ती पाहिजे’

Devendra Fadnavis Latest News मुंबई : शिंदे-फडणवीस यांचे सरकार ३० जून रोजी स्थापन झाले. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल ४० दिवसांनी म्हणजे ९ ऑगस्ट रोजी झाला. यानंतर खाते वाटप कधी होणार, असा प्रश्न विचारला जात होता. याचे उत्तर रविवारी (ता. १४ ऑगस्ट) मिळाले. सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातील खाते वाटप करण्यात आले. यात वाटप जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांनी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात कायम राहणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे हेच खात होत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृह आणि अर्थ खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तीन पैकी दोन महत्त्वाचे खाते भाजपच्या वाट्याला आले आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने सुपर सीएम ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. अशात खातेवाटपावरून आमच्यात कोणताही वाद नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

आमच्या मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार झाला आहे. त्यामुळे मंत्र्यांवर अधिकचा भार टाकण्यात आला आहे. अशाही परिस्थितीत मिळालेल्या खात्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढील विस्तार केल्यावर अधिकचे खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले जाईल. खात कुठले हे महत्त्वाचे नाही. तर खात चालवणारा व्यक्ती योग्य पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमच्यात खाते वाटपावरून कोणताही वाद नाही. त्यांना वाटलं तर आम्ही आमचे खात देऊ तसेच आम्हाला वाटलं तर आम्ही त्यांचे खात मागून घेऊ. विस्तारात आमचे खाते आमच्या लोकांना मिळतील. तर त्यांचे खाते त्यांच्या लोकांना मिळतील. मात्र, मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार कधी होईल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सांगतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता जे झालं ते झालं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलले हे मला माहिती नाही. मात्र, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलं नव्हतं. त्याचा मी साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मी केली होती. आता जे झालं ते झालं, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.