फडणवीस गुंडांचा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

फडणवीस गुंडांचा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

मुंबई : मुखवटे उतरले आहेत, थापाडे चेहरे समोर आले आहेत, असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला गुंडांची संख्या वाढत आहे. गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होते की काय, असे वाटू लागले आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले. भाजपबद्दल काही बोलायचे नाही; पण माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राबद्दल जर असा समज झाला तर फार वाईट ठरेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

"मातोश्री' येथे पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी भाजपकडून झालेल्या आरोपांचा समाचार घेतला. मी जास्त बोलणार नाही, माझा घसा बसेल, अशी कोपरखळीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारली. ""एकेकाळी लाल किल्ल्यावर भाषण केले म्हणून पंतप्रधान होत नाही, असे म्हणणारे आज स्वत:ला पांडव म्हणत असतील तर तेही पांडव ठरत नाहीत. जर कुणी स्वत:ला कृष्ण म्हणून घेतले तर कृष्णही होत नाही. आपण काय, स्वत:ला कुणाची उपमा देतोय. हे सगळे हास्यास्पद आहे,'' असा टोला लगावत भाजपचा मेळावा म्हणजे कोकणातील दशवताराचा खेळ होता, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत कायदेशीररीत्या राम मंदिर बांधण्याचे आश्‍वासन भाजपने दिले आहे. त्यावरूनही ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "बाबरी पाडल्यानंतर पळालेले आता पुन्हा हळूहळू एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या वेळी जमा केलेल्या विटा आता पुन्हा सापडताहेत का ते शोधत आहेत. त्या सापडल्या तर कदाचित राम मंदिर बांधतील. मंदिर वही बनायेंगे, मगर कब? आता कुणी त्यांना विचारत नाही. अच्छे दिन कधी येतील विचारत नाहीत. मतदारच औकात ठरवणार आहेत. पारदर्शकतेच्या मुद्यावर मी जो मुद्दा मांडलाय त्यावर काहीच बोलत नाहीत.''

आधुनिक देश घडवायचाय
आम्हाला आधुनिक भारत घडवायचा आहे. आम्हाला चांगला महाराष्ट्र, मुंबई घडवायची आहे. मुंबई व ठाण्यासाठी जी वचने दिली ती पूर्ण करायची आहेत. त्यानुसार अन्य वचननामे आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत, असे या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'ते' मुद्दे खोडून दाखवा
आतापर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम करत आलात, आशीर्वाद देत आलात. मी शिवसैनिकांना सांगितलं आहे, की त्यांना काय टीका करायची ती करू द्या तुम्ही चांगले मुद्दे घेऊन लोकांसमोर जा. आम्ही जे करून दाखवले आहे ते दाखवलेलेच आहे. म्हणून ते होर्डिंगच्या स्वरूपात आम्ही मांडत आहोत. ते मुद्दे खोडून दाखवा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com