
Devendra Fadnavis : बावनकुळेंच्या कसिनो प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
मुंबईः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कुटुंबासोबत माकाऊ येथे गेलेले आहेत. तेथील त्यांचा एक फोटो संजय राऊतांनी ट्वीट करुन बावनकुळे कथितपणे जुगार खेळत असल्याचा दावा केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांची विकृत मानसिकता दिसून येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासहीत हॉटेलला थांबले होते. जिथे त्यांनी जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूला कॅसिनो आहे. मात्र जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्वीट केला आहे. बावनकुळेंचं कुटुंब त्यांच्यासोबत आहे. ही विकृत मानसिकता संपवली पाहिजे. मॉर्फ केलेले फोटो टाकून वाईट आरोप करणं म्हणजे राजकारणाची पातळी खाली जात असल्याचं लक्षण आहे.
दरम्यान, संजय राऊत म्हटले होते की, माकाऊ इथं बावनकुळे यांनी साडेतीन कोटी रुपये उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याचं हे माहशय द्युत खेळले तर बिघडले कुठे? असं उपहासात्मक ट्वीट त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय जुगार खेळत आहेत.. फोटो झूम करु पाहा हे तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी हैं... असा गर्भित इशारा राऊतांनी दिला.
दरम्यान, महाराष्ट्र भाजपने ट्वीट करुन सांगितलं की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी आहेत तेथील हा परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्यंच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?
असं ट्वीट करुन भाजपने आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर देशात जावून ज्या ब्रँडची घेतात त्याच ब्रँडची आदित्यकडे आहे. ठाकरे गट आणि भाजपमध्ये बावनकुळेंच्या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.