शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 December 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे, या शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका केली.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे, या शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. अवघे 80 तास मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. आता विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांनी लोकसत्ता डॉट कॉमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या सत्तानाट्याविषयी वक्तव्ये केली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

फडणवीस म्हणाले, की मी गेल्या पाच वर्षांत काय काम केले अथवा नाही केले. मला लोक नेता मानतात की नाही मानतात, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण पवारसाहेब हे पुरोगामी नेते आहेत. ते तसा थेट उल्लेख करू तर शकत नाहीत. पण अप्रत्यक्षरित्या त्यांना माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे. दुसऱ्या गोष्टीची नाही. पण जातीची आठवण त्यांना प्रत्येक वेळी होते. मी ब्राह्मण आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण दर वेळी काही ना काही निमित्ताने ते माझी जात बाहेर काढत असतात. मी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नक्कीच माझं स्थान काही कमावलं असेल. अन्यथा मी कोणत्या जातीचा आहे, हे आडून-आडून सांगण्याची गरज पवार साहेबांना पडली नसती.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे

पवारसाहेब सोडून इतरांनीही तसे केल्याचे मान्य करत आमच्या विरोधकांची आयुधे जेव्हा संपतात तेव्हा ते माझ्या जातीवर येतात. पण ते ठिक आहे. जात नेत्यांच्या मनात असते. जनतेच्या मनात नसते. मी पुन्हा येईन असे जनतेची सेवा करण्यासाठी म्हटले होते. महाआघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही. तीन पक्षांचे सरकार चालल्याचा इतिहास देशात तरी नाही. मात्र विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला सुरवातीच्या काळात मी कठोरपणे विरोध करणार नाही. त्यांना योग्य संधी देईल. भाजप हाच खऱ्या अर्थाने ओबीसींचा पक्ष आहे. सर्वाधिक ओबीसी आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे ओबीसी नेते नाराज आहेत, या म्हणण्यात अर्थ नाही. सत्ता गेल्यानंतर काही गोष्टींचे मंथन होत असते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis statement on NCP chief Sharad Pawar caste politics