भाजपमध्ये येण्यासाठी रांग, निरंजन यांचे स्वागत: मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

भाजपमध्ये निरंजन डावखरे यांचे स्वागत आहे. निरंजन यांच्या सहभागाने भाजपला मोठा फायदा होणार आहे. डावखरेंच्या तीन पिढ्या राजकारणात सक्रीय आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी डावखरे यांना उमेदवारी देण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करण्यात येईल.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत असलेल्या निरंजन डावखरे यांचे पक्षात स्वागत आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची रांग असून, त्यासाठी थोडावेळ वाट पाहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी 'राष्ट्रवादी'ला धक्‍का दिला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी 'राष्ट्रवादी'च्या आमदारकीचा राजीनामा देत भापजमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. आज (गुरुवार) त्यांनी मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की भाजपमध्ये निरंजन डावखरे यांचे स्वागत आहे. निरंजन यांच्या सहभागाने भाजपला मोठा फायदा होणार आहे. डावखरेंच्या तीन पिढ्या राजकारणात सक्रीय आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी डावखरे यांना उमेदवारी देण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करण्यात येईल. भाजपच्या संपर्कात आणखी अनेक नेते असून, रांगेत उभे आहेत. त्यासाठी आणखी थोडावेळ वाट बघा.

निरंजन डावखरे म्हणाले, की भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विकासाच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवून मी हे पाऊल उचलले आहे. पदवीधर आणि शिक्षकांसाठी काम करता येईल. शरद पवार मोठे नेते आहेत, पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे.

Web Title: Devendra Fadnavis talked about Niranjan Davkhare enter in BJP