
पोलीस सरकारच्या नोकरासारखे काम करतायत; फडणवीसांचं गृहसचिवांना पत्र
रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी निघालेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यामुळे भाजपाने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमय्यांसह इतर भाजपा नेत्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला गेलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गृहसचिवांना एक पत्रही लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा: किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला
आपल्या पत्रात फडणवीस म्हणतात की, सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला जाणार आहे, हे पोलिसांना सांगण्यात आलं होतं. पोलीस स्टेशनसमोरची गर्दी दूर करण्यासाठीही त्यांना सांगितलं होतं. पण ही गर्दी हटवण्यात आली नाही आणि हा हल्ला झाला. पोलिसांसमोर आणि पोलीस स्टेशनसमोर असा हल्ला होणं गंभीर बाब आहे. केंद्राने सोमय्यांना झेड सुरक्षा देऊनही मुंबई पोलीस गंभीर नाहीत. मुंबई पोलीस देशातलं सर्वोत्कृष्ट पोलीस दल महाविकास आघाडी सरकारच्या नोकरासारखं काम करत आहे. पोलिसांनी अद्यापही या घटनेला गांभीर्याने घेतलेलं नाही. असं करून मुंबई पोलिसांनी सोमय्यांवरच्या हल्ल्याचं समर्थनच केलं आहे.
हेही वाचा: किरीट सोमय्या तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग
हल्लेखोरांविरोधात कोणतीही कारवाई करणं राजकीय दबावामुळे पोलिसांना अशक्य झालं आहे. महाराष्ट्रातली धोक्यात आलेली कायदा व्यवस्था, विरोधी पक्षांच्या मूलभूत अधिकारांचं होणारं हनन आणि अराजकतेची स्थिती लक्षात घेता ही घटना गांभीर्याने घेऊन तात्काळ कठोर कारवाई करावी हीच आपल्याकडे मागणी आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी गृहसचिव अजय भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Web Title: Devendra Fadnavis Wrote A Letter To Home Secretary Ajay Bhalla On Attack On Kirit Somaiyya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..