फडणवीसांमुळेच युतीत तणाव?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

शिवसेना - भाजप युतीतल्या तणावाला केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत असल्याची चर्चा समोर येत असून, यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. युती करताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारचे शब्द दिले ते आता पाळताना भाजपची अडचण होत आहे.

मुंबई - शिवसेना - भाजप युतीतल्या तणावाला केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत असल्याची चर्चा समोर येत असून, यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. युती करताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारचे शब्द दिले ते आता पाळताना भाजपची अडचण होत आहे. यामुळेच फडणवीस व ठाकरे यांच्यात संवाद तुटलेला असून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनाही मध्यस्थी करण्यात अडचणी असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांत सुरू आहे. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राज्याच्या सत्तेत भाजपचा वाटा मोठा असलाच पाहिजे, असे फडणवीस यांना बजावले असून शिवसेनेला अतिरिक्त खाती व  मुख्यमंत्रीपद देण्यास केंद्रीय भाजपचा विरोध आहे. युतीचे समिकरण जुळवण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडेच दिली असल्याने इतर कोणताही नेता सत्ता समिकरणाचे गणित जुळवण्यात पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.

अशा स्थितीत फडणवीस यांच्यासोबत शिवसेनेने संवाद बंद केल्याने अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. आता यात केवळ फडणवीस यांनीच अंतिम निर्णय घेत तोडगा काढावा, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घेतली असून फडणवीस एकाकी पडल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis Yuti Tension Politics