
शिंदे गटाला शिवसेना पक्ष अधिकृतरित्या मिळाल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले खरी...
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर जो पक्ष होता त्यांच्याच पक्षाला पुन्हा नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यासाठी शिंदे यांचे अभिनंदन. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर आधिकार सांगू शकत नाही. शिंदेना देखील निकालाचा आत्मविश्वास होता,असं फडणवीस यांनी म्हटलं.
यापूर्वी देखील असे निकाल झाले आहेत. आमदारांची संख्या लक्षात घेऊनच निकाल देण्यात आला आहे. वोट संख्या, त्याची टक्केवारी हे सगळं आमदारांच्या माध्यमातून ठरत असते. मी पूर्ण निकाल वाचलेला नाही. पण आता पुन्हा पाहून बोलेल, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
शिंदेचे पुन्हा अभिनंदन करतो. आयोगाचा निकाल काय आला त्यावर विरोधक बोलणारच. काहीही झालं तरी दबाव..असं बोललं जातं. आता सगळ्या बाजुंचा विचार करुन निकाल दिला गेला आहे.