"मोदी ब्रॅंडच्या नादात भाजपला वाजपेयींचा विसर': धनंजय मुंडे

संदीप खांडगेपाटील
सोमवार, 22 मे 2017

मोदी ब्रॅन्डिंग करणारे जीएसटी मोदींनीच आणल्याचा दावा करताना आपल्याच वाजपेयींकडे कानाडोळा करत आहेत. ज्यावेळी जीएसटीचा विचार मांडला गेला त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदींनीच जीएसटीला विरोध केला होता. ते पंतप्रधान होताच त्यांची भूमिका बदलली

मुंबई : "एक देश, एक करप्रणाली' या संकल्पनेचा सर्वप्रथम पुरस्कार भाजपचेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या काळात केला होता. आता मात्र भाजपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाप असल्याने वाजपेयींचा विसर पक्षाला विसर पडला आहे का?,'' असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज (सोमवार) विधानपरिषदेत केला. 

जीएसटीबाबत राज्य सरकारने बोलविलेल्या विशेष अधिवेशनादरम्यान मुंडे यांनी सभागृहात सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर व मोदी ब्रॅण्डवर हल्ला चढविला. 
"वाजपेयीनंतर देशाचे अर्थमंत्री असताना पी. चिंदम्बरम यांनी याबाबत कार्य केले. यूपीए सरकारनेही त्यावर कार्य केले. विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देशाचे अर्थमंत्री असताना जीएसटीबाबतचे विधेयक सभागृहात सर्वप्रथम मांडले. हे विधेयक बहुमताने नाही तर एकमताने संमत व्हावे ही भूमिका यूपीए सरकारने घेतल्याचा,'' उल्लेख मुंडे यांनी केला. 

""मोदी ब्रॅन्डिंग करणारे जीएसटी मोदींनीच आणल्याचा दावा करताना आपल्याच वाजपेयींकडे कानाडोळा करत आहेत. ज्यावेळी जीएसटीचा विचार मांडला गेला त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदींनीच जीएसटीला विरोध केला होता. या विधेयकामुळे राज्याची स्वायत्ता धोक्‍यात येणार असल्याची भूमिका मोदींनी मांडली होती. ते पंतप्रधान होताच त्यांची भूमिका बदलली,'' असा टोमणाही त्यांनी मारला. 

Web Title: Dhanajay Munde criticizes BJP