'उद्धवजी, आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

मुख्यमंत्री आघाडीचा असेल 

भाजपा शिवसेनेत मुख्यमंत्री कोणाचा यावरून जुगलबंदी रंगली असताना मुख्यमंत्री ना सेनेचा ना भाजपचा असेल मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचा असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक विमा कंपन्यांची कार्यालये बंद करू, असा इशारा दिला. त्याचा समाचार घेताना गेल्या 5 वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत. तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. शिवसेनेला मात्र निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उद्धवजी, आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असे मुंडे म्हणाले. 

मुख्यमंत्री आघाडीचा असेल 

भाजपा शिवसेनेत मुख्यमंत्री कोणाचा यावरून जुगलबंदी रंगली असताना मुख्यमंत्री ना सेनेचा ना भाजपचा असेल मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचा असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ज्यांनी शिवरायांचे नाव घेऊन मागील निवडणुका जिंकल्या, त्यांना 5 वर्षात शिवस्मारक उभारता आले नाही, त्याच्या कामात गैरव्यवहार केला, छत्रपतींच्या नावाने कर्जमाफी योजना आणून फसवणूक केली, तेच आता पुन्हा 'शिवशाही सरकार' म्हणून शिवरायांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. 

दरम्यान, पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आल्याचा त्यांनी निषेध करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल यावेळी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Criticizes on Uddhav Thackeray