'त्या' विद्यार्थ्यांसाठी धनंजय मुंडेंनी घेतला मोठा निर्णय

पूजा विचारे
Friday, 22 January 2021

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राउंड) माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना धनंजय मुंडे यांनी मोठा दिलासा दिला आहे.

मुंबई: केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राउंड) माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा दिलासा दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जाची पोहोच सोबत जोडली आहे. मात्र अखेरपर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही. अशा मेरिट लिस्टमध्ये असलेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जर त्यांनी संस्था स्तरावर प्रवेश घेतला तर त्यांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील देय असलेले शैक्षणिक शुल्क देण्यात येणार आहे. 

'कॅप'च्या दुसऱ्या राउंडमध्ये प्रवेश घेण्याचा २० जानेवारी हा अखेरचा दिवस होता. मात्र मार्च २०२० पासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थ्यांना आपली जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. सर्व राखीव प्रवर्ग मिळून असे ६८७५ विद्यार्थी असल्याचे सीईटी सेलच्या कक्षाने कळविले आहे.  दुसऱ्या राउंडच्या अंतिम दिवशी देखील प्रवेशास पात्र असलेल्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. त्यामुळे मागासवर्गीय प्रवर्गातील हे विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता समितीकडे आपले अर्ज दाखल करून पोहोच पावती जोडून CET कडे अर्ज दाखल केला आहे. मात्र बुधवारी जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही, म्हणून त्यांना राखीव जागेवर प्रवेश मिळू शकला नाही. अशा मेरिट लिस्टमधील विद्यार्थ्यांना संस्था स्तरावर प्रवेश मिळवला असला तरीही त्यांना ३१ मार्च २०१६ च्या सरकारच्या निर्णयानुसार अनुज्ञेय असलेले शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देय राहील.

हेही वाचा- रेणू शर्मांनी तक्रार मागे घेताच वकील रमेश त्रिपाठींचा केसला रामराम

तसेच २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना हा लाभ त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागू राहील. या बाबतचा स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिवांना दिले आहेत. तसेच याबाबतच्या सूचना सीईटी सेलच्या आयुक्तांनी त्यांच्या स्तरावरून निर्गमित करून विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा अशा सूचनाही मुंडे यांनी दिल्या आहेत.

Dhananjay Munde relief students admission reserved seats vocational courses cap round


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde relief students admission reserved seats vocational courses cap round