
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील अन्य ८ नेत्यांनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. तर आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला असून त्याबाबत 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
अजित पवार गटाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे. 6 तारखेच्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडतील. यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आलेले आहेत. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याबाबत सांगण्यात आलं आहे.
तर निवडणूक आयोगाच्या या सुनावणीच्या तारखांबाबत आणि निर्णयाबाबत अजित पवार गटाकडून वारंवारं वेगवेगळी भाष्य केली जात आहेत. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था असून प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे यांना सुनावणीची माहिती नेमकी मिळते कुठून असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे हे नेते आता निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले आहेत का? किंवा त्यांना कोणती वेगळी बातमी दिल्लीच्या अदृश्य हातांनी दिली आहे का? याचा अर्थ आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळणार का नाही. जर प्रफुल पटेल, धनंजय मुंडे हे निवडणूक आयोगाच्या तारखा देत असतील तर याचा अर्थ पेपर फुटला आहे असा आहे.
जर मग पेपर फुटला असेल तर आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्व विचारू, ही तारीख या दोघांना कशी समजली, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.
प्रफुल पटेल यांना भाजपने निवडणूक आयोगाने अध्यक्ष बनवलं असेल असा उपरोधिक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.