esakal | गाय दूध खरेदी-विक्रीत लिटरमागे २३ रुपयांचा फरक; शेतकरी आणि ग्राहकांची आर्थिक लूट

बोलून बातमी शोधा

Cow Milk
गाय दूध खरेदी-विक्रीत लिटरमागे २३ रुपयांचा फरक; शेतकरी आणि ग्राहकांची आर्थिक लूट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील खासगी दूध संघांनी गाईच्या दूधाच्या खरेदी दरात प्रति लिटर किमान पाच व कमाल सात रुपायांची कपात केली आहे. या कपातीनंतर गाईचे दूध प्रति लिटर २५ रुपयांनी खरेदी करून ते पिशवी बंद करुन ४८ रूपये लिटरने विक्री करण्यात येत आहे. परिणामी दुधाच्या खरेदी व विक्री दरात प्रति लिटर २३ रुपायांची तफावत निर्माण झाली आहे.

खरेदी दरात कपात केल्याने शेतकऱ्यांचे तर, विक्री दरात कपात न केल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. या तफावतीच्या माध्यमातून दूध संस्था या आपापल्या संस्थेचा तोटा भरुन काढत असल्याचे राज्यातील काही दूध संस्थांच्या अध्यक्षांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

दूध संस्थांच्या या अमाप नफेखोरीचा शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना मात्र मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. मागील तीन वर्षात खरेदी दरात चार ते पाच वेळा चढ-उतार झाला आहे. याउलट विक्री दरात पाच वेळा वाढ झाली आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत कोणत्याही दूध संघाने विक्री दरात एकदाही कपात कपात केलेली नसल्याचेही या अध्यक्षांनी सांगितले.

हेही वाचा: Corona Update : पुणे शहरात आजही नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

  • लॉकडाऊनमुळे दूध पावडर आणि बटरचे (लोणी) दर प्रतिकिलो प्रत्येकी पन्नास रुपयांनी कमी झाल्याने खासगी दूध संघांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दूधाचा प्रतिलिटरचा दर पुन्हा २५ रुपये केला आहे.

  • मागील तीन वर्षात पाच वेळा प्रतिलिटर दोन रुपायांनी दूधाचा विक्री दर वाढलेला आहे. यामुळे तीन वर्षापुर्वी ३८ रूपये लिटर असलेले दूध आता ४८ रूपये लिटरने विक्री केले जाते.

  • साधारणतः दूध खरेदी केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणे, पिशवी बंद करणे आणि प्रत्यक्ष ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दूध संस्थांना प्रति लिटर १० रूपये खर्च येतो. त्यात डिलर, सबडिलर आणि विक्रेत्यांचे कमिशन ही असते.

लिटरमागे १३ रुपयांचा नफा

या सुत्रांनुसार दूध संस्थांना सर्व खर्चांसह आणि विक्रेत्यांच्या कमीशनसह ३५ रुपये लिटरने दूध पडते. हेच दूध ४८ रुपायांनी विक्री केल्यानंतर प्रतिलिटर १३ रुपयांचा नफा या संस्थांना मिळत आहे.

हेही वाचा: पुणे महापालिकेकडून 'कोविड शववाहिनी' अ‍ॅप; स्मशानभूमीही लगेच कळणार

लॉकडाऊनमुळे विक्रीत ३० टक्के घट

लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये, हाॅटेल, चहा टपऱ्या बंद आहेत ‌ यामुळे दूधाच्या विक्रीत सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे. या घटीमुळे झालेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठीच हा अमाप नफा कमविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

- दूध संघांनी दर चढ-उतार निधी स्थापन करणे अनिवार्य.

- दूधाच्या खरेदी व विक्री दरावर नियंत्रण ठेवणारी सक्षम यंत्रणा हवी.

- सरकारने स्थापन केलेल्या समितीनेच दर निश्चित केले पाहिजेत.

- समितीने घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.

दूधाच्या खरेदी दरात कायम चढ-उतार होत असतो. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. कारण दर कमी झाला तरी गाईच्या कासेत दूध साठवुन ठेवता येत नाही. एकदा निश्र्चित केलेला विक्री दर मात्र कधीच कमी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

- डॉ. विवेक क्षीरसागर, कार्यकारी संचालक, कात्रज डेअरी, पुणे.