महाराष्ट्रातील शेतीमालास पंजाबमध्ये थेट प्रवेश

महाराष्ट्रातील शेतीमालास पंजाबमध्ये थेट प्रवेश

मुंबई - ‘देशातील अन्नधान्यांची कोठारे’, अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आता नवे ‘कृषिबंध’ निर्माण झाले आहेत. या दोन राज्यांतील कृषिमाल, तसेच प्रकिया झालेल्या मालाच्या विक्रीसाठी विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून जाळे उभारले जाणार असून, यासाठी उभय राज्यांत आज तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख आणि पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.  महाराष्ट्र शासन ‘अटल महापणन विकास अभियान’ राबवत असून, त्याचा एक भाग म्हणून हे करार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘पंजाब मार्कफेड’च्या ‘सोहना’ या कृषीप्रक्रिया उत्पादनांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. उत्तर भारतात या ब्रॅंडला खूप  मागणी आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये असलेली उत्पादने पंजाबमध्ये पोचणार आहेत. याच पदार्थांचे ब्रॅंडिंग करून ‘पंजाब मार्कफेड’च्या मॉलमधून विक्री करण्यास मोठा वाव आहे. तसेच, पंजाबच्या ‘सोहना’ या ब्रॅंडसह अन्य उत्पादने ‘महामार्कफेड’ आणि ‘विदर्भ पणन महासंघा’च्या विक्री केंद्रातून महाराष्ट्रात विकल्या जाऊ  शकतात.

महाराष्ट्राचे कौतुक
पंजाबचे सहकारमंत्री रंधावा म्हणाले, की पंजाब आणि महाराष्ट्राचे भावनिक नाते आहे. पंजाबला अभिमान असलेले संत नामदेव महाराज महाराष्ट्रातून पंजाबला आले, तर बंदा सिंग बहादूर यांचेही महाराष्ट्रात बऱ्याच कालावधीसाठी वास्तव्य होते. दोन्ही राज्यांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासासाठी दोन्ही राज्ये परस्पर सहकार्याची भूमिका घेतील. पंजाबने कृषी विकासात आणि कृषिमालाच्या मार्केटिंगमध्ये केलेल्या कामाच्या पद्धतीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने पंजाबला यावे.

हा माल पंजाबमध्ये
सेंद्रिय गूळ, हळद, ज्वारी, बाजरी, इंद्रायणी, कोलम तांदूळ, हिमरू शाल, मालवणी मसाला, काबुली चना, लातूर डाळ, केळीचे वेफर्स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com