

तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, २१ जानेवारी हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने सर्वच गटातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, कामती बु. गटातून भाजपकडून लांबोटीतील विमल तानाजी खताळ आणि विरवडे बु. येथील कोमल अंकुश आवताडे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरवडे बु. येथील अश्विनी नरसिंह पाटील आणि चिंचोलीकाटीतील अनिता भोसले इच्छुक आहेत. भाजपकडून खताळ कुटुंबाला आणि राष्ट्रवादीकडून नरसिंह पाटील यांच्याच घरात उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. पक्षाकडून ‘बी’ फॉर्म कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लांबोटीतील तानाजी खताळ यांनी २०१७ मध्ये कामती गटातून विजय मिळविला होता. त्यांनी भीमा लोकशक्ती परिवार गटातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी स्व. खताळ यांनी जवळपास दोन हजार मताधिक्यांनी विजय मिळविला होता. सावळेश्वर, लांबोटी, गोटेवाडी, कोळेगाव, नांदगाव, हराळवाडी, कोरवली, लमाणतांडा, पिरटाकळी यासह इतरही गावांमधून त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले आणि पुढे निवडणुकाच झाल्या नाहीत. खताळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अक्षय खताळ व कुटुंबातील इतरही सदस्यांनी सामाजिक कार्याचा वसा तसाच सुरू ठेवला. माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या खताळ कुटुंबातील सदस्यालाच कामती गटातून उमेदवारी मिळेल, असे बोलले जात आहे. दुसरीकडे, विरवडे बु. येथील कोमल आवताडे यांनाही उमेदवारीची आशा आहे. त्यांचेही काम विरवडे परिसरात चांगले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीतून इच्छुक नरसिंह पाटील यांची ऊसतोडीची मशिन असून त्यांच्या भागातील शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली आहे. सीना नदीला आलेल्या महापुरात देखील त्यांनी पूरग्रस्तांना मदत केल्याचे लोक सांगतात. या गटात प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. या भागात माजी आमदार राजन पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचेही या गटावर विशेष लक्ष आहे.
धनगर, मराठा, दलित मते निर्णायक
कामती बु. गटात धनगर समाज मोठा असून मराठा मतदार निर्णायक आहे. दोन्ही पक्षांतील उमेदवारांना ही मते निर्णायक ठरणार आहेत. भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यावर कामती गटातील गावांमध्ये सर्व्हे केला आहे. त्यात जो उमेदवार वरचढ ठरला, त्यालाच संधी दिली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतील.
कामती बु. गटात ‘ही’ २० गावे
सावळेश्वर गण : सावळेश्वर, चिंचोलीकाटी, विरवडे खु., अर्जुनसोंड, पोफळी, लांबोटी, गोटेवाडी, मुंढेवाडी, कोळेगाव, नांदगाव.
कामती गण : कामती बु., विरवडे बु., कोरवली, हराळवाडी, कामती खु., लमाणतांडा, शिंगोली, तरटगाव, पिरटाकळी, शिरापूर मो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.