थर्टीफर्स्टला सावधान; रोगट कोंबड्या अन् बकरे!

Cock-and-Goat
Cock-and-Goat

नवी मुंबई - 'थर्टीफर्स्ट'निमित्त चिकन आणि मटणाचा बेत आखत असाल, तर सावध व्हा... नियमित पुरवठ्यापेक्षा खवय्यांकडून अधिक मागणी झाल्याने रोगट कोंबड्या आणि बकऱ्यांचे चिकन व मटण विक्री होण्याची भीती आहे. त्यामुळे मटण आणि चिकनवर ताव मारताना काळजी घ्या, असे आवाहनच सरकारी यंत्रणांनी केले आहे.

थर्टीफर्स्टनिमित्त मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात. बड्या हॉटेलांपासून ढाब्यांपर्यंत खवय्यांची संख्या वाढल्याने चिकन आणि मटणाची मागणीही वाढते. त्यामुळे चढ्या भावाने विक्री करून नफा कमावण्यासाठी काही चिकन व मटणविक्रेते रोगीट कोंबड्या व बकऱ्यांची कत्तल करण्याची शक्‍यता असते. एका ब्रॉयलर कोंबडीचे आयुर्मान सहा आठवड्यांचे असते; मात्र ग्राहकांच्या नव्या वर्षाच्या स्वागताच्या उत्साहाचा गैरफायदा घेतला जाण्याची भीती आहे. अशा रोगट कोंबड्या किंवा बकरे ग्राहकांच्या समोरही कापले तरी ओळखण्याचे ज्ञान नसल्यामुळे खराब मांस ग्राहकांच्या माथी मारले जाईल. यामुळे आरोग्यास हानी पोहचेल, असे डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात "सकाळ'च्या प्रतिनिधीने काही विक्रेत्यांशी चर्चा केली असता, "साहेब, सध्या तुम्ही चिकन-मटण खरेदी करू नका', असा अजब सल्लाच त्यांनी खासगीत दिला.

बकरा पुरवठ्यात घट
महिनाभरापासून बाजारात बकऱ्यांची आवक घटली आहे. सध्या देवनारमधील कत्तलखान्यात राजस्थान, गुजरात आणि ग्रामीण महाराष्ट्रातून बकरे विक्रीसाठी येतात. ते दक्षिण भारतात पाठवले जात आहेत. तेथे मटण 600-700 रुपये किलोने विकले जाते. त्यामुळे मुंबई व उपनगरात बकऱ्यांचे प्रमाण घटले आहे. थर्टीफर्स्टला मुंबईत 30 हजार बकरे आणि पाच ते सहा लाख कोंबड्यांचा फडशा पडणार आहेत.

भाव वधारले 
मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने मुंबई आणि उपनगरांमध्ये मटण 450 ऐवजी 480 ते 560 रुपये किलोने विकला जात आहे. मटणामुळे कोंबड्यांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. ब्रॉयलर जिवंत कोंबड्या 120 पासून 160 रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत, तर चिकनची विक्री 200 ते 250 रुपयाने सुरू आहे. 

गावठी कोंबड्याही महाग
गावठी कोंबड्यांचेही प्रमाण यंदा घटल्याने दर वधारले आहेत. ग्रामीण भागात कोंबड्या पाळण्याचे प्रमाण कमी झाल्याने गावठी कोंबड्यांचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे 300 रुपये किलोने विकली जाणारी गावठी कोंबडी 650 रुपयांवर पोहचली आहे.

उघड्यावर विक्री होणाऱ्या बेकायदा दुकानांतून नागरिकांनी मटण किंवा चिकन खरेदी करू नये. अशा बेकायदा विक्रेत्यांवर महापालिकेतर्फे कठोर कारवाई केली जाईल.
- डॉ. वैभव झुंझारे, पशुवैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका 

खराब चिकन आणि मटण खाल्ल्याने पोटाचे विकार होतात. विषबाधा होऊन मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो. तसेच, ताप, अतिसार, विषमज्वर, ई-कोलायपासून होणारे जीवाणूजन्य आजार उद्धवण्याची शक्‍यता असते. आजारी प्राण्यांचे मांस खाल्ल्यास विषाणूजन्य आजार होऊ शकतात. 
- डॉ. रवींद्र झेंडे, प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com