esakal | काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; का ते वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb-thorat

मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली, आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणताही व्यक्तिगत मुद्दा नव्हता. 
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते

काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; का ते वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय घेताना आम्हाला सामावून घेतले जात नाही, अशी नाराजी व्यक्त करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून, आम्ही नाराज नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण बैठकीला ‘मातोश्री’वर आले होते. ‘आमची काही नाराजी नाही, सकारात्मक चर्चा झाली असून वादाचा काही विषय नाही,’ असे बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले. बैठकीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊतही ‘मातोश्री’वर आले होते.

नितीन गडकरी म्हणतात, वीज ही भविष्यातील इंधन 

‘विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केले जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झाले तेव्हा त्या प्रमाणात मंत्रिपदे मिळाली. मात्र सत्तेतील अन्य वाटप समसमानच ठरले होते. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याची बदली किंवा वैयक्तिक विषय नाही,’’ असे थोरातांनी सांगितले.

आज मला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे; काय म्हणताहेत उद्धव ठाकरे

'‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘न्याय योजना’ देशासाठी मांडली आहे. गरिबांना काही मदत करता येते का याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली,’’ असेही थोरात यावेळी म्हणाले.

जवळपास गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र बैठकही झाली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडतील, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती. आम्हाला मुख्यमंत्र्यांना समोरासमोर भेटायचे आहे. आमचे प्रश्न हे जनतेशी निगडित आहेत, असेही ते म्हणाले होते.

साखर कारखान्यांच्या सॅनिटायझर निर्मितीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचा वाढता नाराजीचा सूर लक्षात घेऊन अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस नेत्यांनी दिले.

चार जागा हव्यात
विधानपरिषदेत नेमावयाच्या १२ जागांपैकी चार जागा काँग्रेसला हव्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सत्तेत समसमान वाटप हे सूत्र आहे. त्यानुसार काँग्रेसला चार जागा राज्यपाल नेमणार असलेल्या जागांमधून मिळायला हव्यात.