खातेवाटपावरुन अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात रंगला कलगीतुरा?

Untitled-3.jpg
Untitled-3.jpg
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीत आता खातेवाटपावरून कलगीतुरा रंगल्याची माहीती पुढे येते आहे. यामुळे मंत्रीमंडळ विस्तारासारखाच वेळ आता खातेवाटपालाही लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे. खातेवाटप बैठकीतील चर्चेवेळी अशाेक चव्हाण व अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे महाआघाडीत सगळे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.  

राज्यात अनपेक्षितपणे झालेल्या महाविकासआघाडीच्या प्रयोगानंतर मोठ्या राजकीय उलथापालथ होऊन सत्ता स्थापन झाली. मात्र, त्यानंतर साधा मंत्रिमंडळ विस्तार होण्यासही मोठा काळ गेला. त्यानंतर आता खातेवाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच गुरुवारी आघाडीच्या बैठकीदरम्यान खातेवाटपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात खडाजंगी झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच हा वाद झाल्याचं एका मराठी वृत्तपत्राने म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, ग्रामविकास किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी झाली. त्यानंतर अजित पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख केला. त्यानंतर अशोक चव्हाण संतापल्याचं सांगण्यात येत आहे. आम्हीही मंत्रिमंडळात आहोत. ते मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. मग त्यांचा येथे काय संबंध? मीही माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे बालयचं आहे ते बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला, असं अशोक चव्हाण यांनी अजित पवारांना सांगितलं.

चव्हाण संतापल्यानंतर अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण संयमी नेते असल्याचं म्हणत या वादाला आणखीच फोडणी दिली. तसेच पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. सत्तास्थापनेपासूनच्या चर्चेत तेही होते. तुमच्यात नेता कोण आहे हे तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा, असंही अजित पवारांनी म्हटलं. यानंतर पवार आणि चव्हाण यांच्यातील वाद आणखी वाढला. पवार यांच्या या वक्तव्यानंतर चव्हाण बैठकीतूनही बाहेर निघून गेले, असंही सांगितलं जात आहे.

अशोक चव्हाण यांनी महसूल खात्याची मागणी केली. तसंच यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचंच यातून समोर येत आहे. 

खातेवाटपाचा निर्णय झाला. काही खात्यांवर वेगवेगळे मतमतांतर आहे. यामुळे असे ठरले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. मतमतांतरावरून बैठकीत खडाजंगी झाल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांना खातेबदलाचा प्रस्ताव दिला आहे. ते यावर निर्णय घेतील, असे सांगितले.

या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते, पण त्यांच्याशी बैठकीतील चर्चा फोनवर केल्याचे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच खातेबदलावर मुख्यमंत्रीच निर्णय़ घेतील, असे सांगितले. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजच खातेवाटप होईल, असे स्पष्ट केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com