
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
नाशिक : कोविड (Covid) काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर राहून शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती आज सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या वतीने देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले.
कोविड काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर राहून शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे या संकटाचा आपण मुकाबला करू शकलो अशा गौरवपूर्ण शब्दात मुख्यमंत्र्यांनी याकाळात केलेल्या कामाचे कौतूक केले. ते पुढे म्हणाले की, जेंव्हा आपला राज्याचा लाडका मुख्यमंत्री म्हणून उल्लेख होतो तेंव्हा त्याचे खरे श्रेय या प्रशासकीय यंत्रणेत समर्पित भावनेने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाते. प्रशासनात काम करत असतांना अनेक अडचणी येतात, आव्हाने समोर येतात परंतू त्यातही काम करत असताना नियमांची चौकट पाळून आपण सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठी किती चांगले काम करू शकतो हे लक्षात घेऊन जो काम करतो त्यातूनच चांगल्या प्रशासनाची सुरुवात होत असते.
हेही वाचा: महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : हवाई सुंदरीला छेडल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेले उपमुख्यमंत्री
राजकीय नेतृत्व हे राज्याच्या हिताची आणि विकासाची स्वप्नं दाखवतात परंतू ती सत्यात उतरवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेला करावे लागते. हे करत असतांना सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील दु:खाचे अश्रू पुसले जाऊन तिथे आनंदाचे अश्रू जेंव्हा येतात तेंव्हा प्रशासन चांगले काम करत आहे असे आपण मानतो. प्रशासन किती सुलभतेने काम करत आहे याचे उदाहरण देतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुलभपणे केलेल्या कर्जमुक्तीचा उल्लेख केला. शेतकरी हिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील 'या' अधिकाऱ्यांना पुरस्कार
या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत प्राप्त पुरस्कार तृतीय पुरस्कार राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांना मिळाला. यात पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे आहे.
शासकीय अधिकारी वर्गवारीमध्ये द्वितीय पुरस्कार जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळाला. पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे.
शासकीय कर्मचारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार अजय राजाराम लोखंडे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, भडगाव नगरपरिषद, भडगाव, जळगाव. पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार निशीकांत सुर्यकांत पाटील, तलाठी, पारोळा शहर, तलाठी कार्यालय पारोळा, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, देण्यात येणार आहे.
हेही वाचा: ठाव-ठिकाणा नसलेल्या पंधरा लाख मतदारांना डच्चू, डबल फोटोवाले रडारवर
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी केले.
Web Title: Distribution Of Prizes Of Prashaskiya Gatimanta Abhiyan In The Hands Of Cm Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..