सहकार, गृहराज्यमंत्र्यांसह आमदार शिंदेंचा आज फैसला; निवडणूक निकालाकडं राज्याचं लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election

सर्वात अटीतटीची आणि चुरशीची ठरलेल्या जावळी सोसायटीचा निकाल प्रथम जाहीर होणार आहे.

सहकार, गृहराज्यमंत्र्यांसह आमदार शिंदेंचा आज फैसला

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची (Satara Bank Election) मतमोजणी आज (मंगळवारी) बॅंक्स असोसिएशनच्या सभागृहात होणार असून, सकाळी आठ वाजता मतपत्रिकेची विभागणी होऊन पहिल्यांदा विकास सेवा सोसायटींची मोजणी होईल. त्यानंतर नागरी बॅंका व पतसंस्था मतदारसंघाची मोजणी होईल. शेवटी राखीव मतदारसंघातील महिला राखीव व ओबीसी मतदारसंघाची मोजणी होऊन निकाल जाहीर होईल. मतांची संख्या कमी असल्याने सर्वात अटीतटीची आणि चुरशीची ठरलेल्या जावळी सोसायटीचा निकाल प्रथम जाहीर होईल. त्यानंतर सहकारमंत्री निवडणूक लढत असलेल्या कऱ्हाड सोसायटीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरापर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत संचालकांच्या २१ जागांपैकी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये खरेदी- विक्री संघ मतदारसंघात आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वर सोसायटीतून राजेंद्र राजपुरे, कृषी उत्पादन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरुपराजे खर्डेकर यांचा समावेश होता. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ जागा अशा एकूण संचालकांच्या अकरा जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, मजूर संस्था मतदारसंघातून अनिल देसाई, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून सुरेश बापू सावंत, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून लहुराज जाधव यांचा समावेश आहे. त्यानंतर उर्वरित दहा जागांसाठी २० उमेदवार रिंगणात राहिले. त्यांच्यासाठी रविवारी (ता. २१) ११ केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली. यामध्ये १९६४ मतदारांपैकी १८९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९६.३३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जावळी आणि खटाव सोसायटीसाठी झाले. कऱ्हाड, जावळी व पाटण मतदारसंघांत चुरशीची लढत झाली. येथे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या निकालाकडं राज्याचं लक्ष

आज (मंगळवारी) बॅंक्स असोसिएशनच्या कार्यालयात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा सोसायटीच्या सहा जागांची मतमोजणी होईल. यामध्ये सर्वात कमी मतदान असलेल्या जावळीचा निकाल पहिल्यांदा कळेल. येथून आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे अशी लढत असून, आमदार शिंदे बाजी मारणार की रांजणे, याची उत्सुकता आहे. कऱ्हाडात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची, तर पाटणला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माणमध्ये शेखर गोरे, की मनोज पोळ, खटावात प्रभाकर घार्गे की नंदकुमार मोरे, कोरेगावात शिवाजीराव महाडिक की सुनील खत्री याची उत्सुकता आहे. ओबीसी प्रवर्गातून प्रदीप विधाते, की शेखर गोरे, नागरी बॅंका व पतसंस्थेतून रामभाऊ लेंभे की सुनील जाधव, महिला राखीवमधून कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील की शारदादेवी कदम, चंद्रभागा काटकर यांची उत्सुकता आहे. सोसायटीच्या निकालानंतर नागरी बॅंक व पतसंस्था मतदारसंघाची मतमोजणी होईल. त्यानंतर राखीव तीन जागांची मोजणी होऊन निकला जाहीर होणार आहे. त्यासाठी एकाच वेळी ११ टेबलांवर मोजणी होणार असून, त्यासाठी ९७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचा: 'ज्यांना मी वाढवलं, तेच मला हद्दपार करायला निघालेत'

loading image
go to top