गुलाल आमचाच! राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या निकालाकडं राज्याचं लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress NCP Shivsena

कुठे रांगेत जाऊन शांततेत तर कुठे वादावादी..,अशा वातावरणात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले.

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या निकालाकडं राज्याचं लक्ष

सातारा : कुठे रांगेत जाऊन शांततेत तर कुठे वादावादी..,अशा वातावरणात काल जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) चुरशीने मतदान झाले. अटीतटीच्या लढतीत वादावादी होऊनही जावळी तालुक्यातील (Jawali Taluka) मतदान सर्वांत आधी संपले. चुरस असूनही माणसह सातारा व खटाव तालुक्यांत सर्वांत शांततेत मतदान झाले. सकाळपासून नेतेमंडळींसह उमेदवार मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. खटाव सोसायटीसाठी थेट कळंबा जेलमधून पोलिस बंदोबस्तात येऊन प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच इतर सर्व दिग्गज नेत्यांनीही आपापल्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केले. मतदान पूर्ण होत असतानाच उमेदवारांनी विजयाची खुण करत आपणच निवडून येणार, असा दावा केला. त्यामुळे दिग्गज नेत्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बॅंकेसाठी काल (रविवार) सकाळी आठ वाजल्यापासून ११ मतदान केंद्रांवर प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासूनच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हातवारे करून लक्ष असू देत असे सांगत होते. त्यामुळे मतदार कोणाला मतदान करतोय, याची उत्सुकता शिगेला पोचली होती. कऱ्हाड सोसायटीच्या मतदान केंद्रावर भोसले गट एकत्र येऊन सहकारमंत्र्यांच्या गटाने उभारलेल्या पेंडॉलमध्ये थांबल्यामुळे चर्चेला उधाण आले. त्यानंतर त्यांनी एकत्र जाऊन मतदान केले. त्यानंतर ॲड. उदयसिंह पाटील यांनी आपल्या मतदारांसमवेत येऊन मतदान केले.

हेही वाचा: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले

तर जावळीत मात्र, सकाळपासून आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) व विरोधी उमेदवार ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांच्यासह जावळीतील नेते मतदान केंद्राच्या बाहेर ठाण मांडून होते. रांजणे यांनी त्यांच्या समर्थक मतदारांना टोपी आणि मास्क घातलेल्या वेशात मतदानासाठी रांगेत आणले. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांनी वेधले. त्यानंतर आमदार शिंदे यांच्या बाजूच्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शशिकांत शिंदे, ऋषिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या समर्थकांत वादावादी झाली. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत दोन्ही गटांना केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगून शांत केले.

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) हेही छत्रपती शाहू जिल्हा क्रिडा संकुलातील मतदान केंद्रावर आले व त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सातारा तालुक्यातील त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मतदान केंद्राबाहेर उपस्थित होते. त्यांनी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर पाटण येथील मतदान केंद्रावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येऊन मतदान केले. यावेळी त्यांना अधिकाऱ्यांनी ओळखपत्र मागितल्याने ते थोडे संतप्त झाले. मी मंत्री असताना मला ओळखपत्र कसे मागता, असे त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. त्यामुळे थोडे वातावरण गरम झाले होते. त्यानंतर सहकार पॅनेलचे नेते सत्यजितसिंह पाटणकर हे आपल्या मतदारांसह आले व त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे शांततेत मतदान प्रक्रिया झाली. फलटणमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे समर्थक मतदार उपस्थित होते.

हेही वाचा: 'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

माणमधील मतदान केंद्रावर सकाळी सहकार पॅनेलचे नेते मनोजकुमार पोळ यांनी सुरवातीला मतदान केले. पण, दुपारपर्यंत आमदार जयकुमार गोरे व त्यांचे समर्थक मतदार मतदानासाठी आलेले नव्हते. दुपारी शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी दोन लक्झरीतून मतदारांना आणून एका रांगेत सर्वांचे मतदान करून घेतले. दुपारपर्यंत आमदार गोरे व त्यांच्या समर्थक मतदार मतदानासाठी आलेले नव्हते. तर शेखर गोरे मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. वाईतील मतदान केंद्रावर आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील यांच्यासह बिनविरोध आलेल्या वाईतील उमेदवारांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे समर्थक मतदारही उपस्थित होते. खटाव तालुक्यातील मतदान केंद्रावर सहकार पॅनेलचे नंदकुमार मोरे यांनी आपल्या मतदारांसह येऊन मतदान केले. पण, सर्वांची उत्सुकता होती ती प्रभाकर घार्गे यांच्याकडे. सकाळी ११ च्या नंतर अचानक मतदारांचा लोंढा आला. त्यानंतर कळंबा जेलमधून पोलिस बंदोबस्तात माजी आमदार प्रभाकर घार्गे मतदान केंद्राच्या दारात आले. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे होते. त्यांनी पोलिस गाडीतून येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते थोडावेळ मतदान केंद्राच्या बाहेर थांबून मतदारांशी चर्चा केली. कोरेगावात सहकार पॅनेलचे शिवाजीराव महाडिक यांनी आपल्या समर्थक मतदारांसमवेत येऊन मतदान केले. त्यानंतर विरोधी सुनील खत्री यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी होती.

हेही वाचा: भाजपच्या आमदारावर राष्ट्रवादी, शिवसेनेची भिस्त; कोणाच्या पारड्यात 'मतदान'

दुपारी बारापर्यंत ६८.३८ टक्के मतदान

मतदानासाठी मतदारांत चुरस होती. सकाळी दहापर्यंत ११ मतदान केद्रांवर एकूण ३१.११ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी बारापर्यंत ६८.३८ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ पर्यंत सर्वाधिक मतदान जावळीत ९५.६५, पाटण ८९.६६, फलटण ७३.९१ झाले होते. त्यासोबतच सातारा ६३.२२, महाबळेश्वर ६६.६७, कऱ्हाड ७१.०८, कोरेगाव ६४.८९, खटाव ६१.३३, माण ४७.०६, खंडाळा ५१.१४, वाई ६२.१२, टक्के मतदान झाले होते.

हेही वाचा: पोलिस बंदोबस्तात माजी आमदार कोठडीतून थेट मतदान केंद्रावर

loading image
go to top