जिल्हा बॅंकांची वाढली 23 हजार कोटींची थकबाकी; 23 बॅंकांची वसुली 40 टक्‍क्‍यांपेक्षाही कमीच 

तात्या लांडगे
शनिवार, 4 जुलै 2020

राज्यातील 30 जिल्हा बॅंकांनी मागच्या वर्षी 31 हजार 527 कोटी 43 लाखांचे शेती व बिगरशेतीसाठी कर्जवाटप केले. मात्र, अतिवृष्टी, पूर, अवकाळीमुळे अडचणीत सापडलेल्या बळिराजाला बॅंकांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे एकूण कर्जवाटपातील आठ हजार 425 कोटी 40 लाखांचीच कर्ज वसुली झाली आहे. 

सोलापूर : जगाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी फडणवीस सरकारने दीड लाखाची तर ठाकरे सरकारने दोन लाखांची कर्जमाफी दिली. तरीही सद्य:स्थितीत राज्यातील 39 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे 23 हजार 102 कोटींची नवी थकबाकी वाढली आहे. त्यामध्ये कर्जमाफीपूर्वी नियमित असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. 

हेही वाचा : लॉकडाउनमध्ये "उमेद'अंतर्गत "या' ग्रामीण महिलांची झाली जीवनोन्नती 

राज्यातील 30 जिल्हा बॅंकांनी मागच्या वर्षी 31 हजार 527 कोटी 43 लाखांचे शेती व बिगरशेतीसाठी कर्जवाटप केले. मात्र, अतिवृष्टी, पूर, अवकाळीमुळे अडचणीत सापडलेल्या बळिराजाला बॅंकांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे एकूण कर्जवाटपातील आठ हजार 425 कोटी 40 लाखांचीच कर्ज वसुली झाली आहे. दरम्यान, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बीड, बुलडाणा व नागपूर या जिल्हा बॅंकांनी मागील वर्षात शेती व बिगरशेतीसाठी 14 हजार 76 कोटींचे कर्जवाटप केले. मात्र, त्यातून फक्‍त 781 कोटी 78 लाखांचीच वसुली झाली आहे. तर दुसरीकडे लातूर, भंडारा, सातारा, चंद्रपूर, ठाणे, गडचिरोली आणि जळगाव या जिल्हा बॅंकांची वसुली 41 टक्‍क्‍यांहून अधिक झाल्याचे राज्य बॅंकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा : संचालक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बॅंकचे सात दिवस बंद 

कर्जवाटपासाठी बॅंकांकडून स्वतंत्र अधिकारी नियुक्‍त 
कर्जमाफीनंतरही शेती व बिगरशेती कर्जाची थकबाकी तथा येणेबाकी वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुतांश बॅंकांनी आता नियमांवर तंतोतंत बोट ठेवत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात जाऊन पिकांची पाहणी करणे, कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे, अशी कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. 

जिल्हा बॅंकांचा पसारा 

  • एकूण जिल्हा बॅंका : 30 
  • मागील वर्षी कर्जवाटप : 31,527.43 कोटी 
  • कर्जाची वसुली : 8,425.40 कोटी 
  • सर्व प्रकारच्या कर्जांची थकबाकी : 23,102.03 कोटी 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे म्हणाले, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शेती कर्जाची थकबाकी 627 कोटी आहे. कर्जमाफीनंतर बहुतांश शेतकरी नियमित कर्जदार झाले, परंतु कर्जमाफीपूर्वी नियमित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांकडेच आता थकबाकी वाढली आहे. कोरोनामुळे रिझर्व्ह बॅंकेने ऑगस्टपर्यंत कर्ज वसुलीस मुदतवाढ दिल्याने आता ऑगस्टनंतर वसुली अपेक्षित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District banks arrears increase by Rs 23,000 crore