मुठीत तलवार बाळगणारे खरे मावळे - रावते

- मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 14 जानेवारी 2017

मुंबई - मोकळ्या मैदानांवर मुठीत काठी ठेवून कवायती करणारे मावळे केव्हापासून झाले, असा प्रश्‍न करीत मुठीत तलवार बाळगणाऱ्यांना मावळे म्हणतात, असे मावळे कोण आहेत हे मुंबईसह अवघा महाराष्ट्र जाणतो, असे नमूद करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - मोकळ्या मैदानांवर मुठीत काठी ठेवून कवायती करणारे मावळे केव्हापासून झाले, असा प्रश्‍न करीत मुठीत तलवार बाळगणाऱ्यांना मावळे म्हणतात, असे मावळे कोण आहेत हे मुंबईसह अवघा महाराष्ट्र जाणतो, असे नमूद करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

समोरचे सैन्य कोणते आहे याचा विचार न करता मावळ्यांसारखे लढण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना काल केले होते. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने प्रथमच "सकाळ'शी बोलताना उत्तर दिले असून, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतील संघर्षाची चुणूक धारदार असेल, असे सूचित केले आहे. युती किती जागांवर करायची याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सांगत आम्ही शिवसैनिक खरे मावळे असल्याने आदेशाचे पालन करतो त्याबद्दल कोणताही प्रश्‍न करत नाही, असेही रावते यांनी सांगितले. "पारदर्शी कारभार' या अजेंड्याकडे लक्ष वेधत शिवसेनेच्या मंत्र्यावर, महापौरांवर आणि भाजपने "माफिया' ठरविलेल्या महापालिकेतील एकाही स्थायी समिती अध्यक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत काय, असा प्रश्‍नही त्यांनी केला. पारदर्शी कारभाराची भाषा करणाऱ्या पक्षातील काही मंत्र्यांची चिठ्ठी संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर व्हॉट्‌सऍपवर वाटली जाते आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपने स्वीकारलेल्या आक्रमक धोरणानंतर आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत युतीबद्दल तसेच सहकारी पक्षाच्या धोरणाबद्दल पक्षप्रमुखांना कोणताही प्रश्‍न विचारला गेला नसल्याचे समजते. या बैठकीपूर्वी काही मंत्र्यांनी भाजप-शिवसेनेतील वाद अधिकच ताणला गेला तर नेमके काय होईल, असा प्रश्‍न केला असता शिवसेनेतील सर्व निर्णय "मातोश्री' घेत असते. त्यामुळे त्याबद्दल चर्चा करणे अनुचित असल्याची आक्रमक भूमिका काही मंत्र्यांनी घेतली. शिवसेनेसमोर आव्हान उभे केले जात असेल, तर पन्नास वर्षांची निष्ठा सिद्ध करण्याची हीच वेळ असल्याची भावनाप्रधान भाषाही काही मंत्र्यांनी वापरली. या संदर्भात संपर्क साधला असता, रावते यांनी अंतर्गत चर्चेचा तपशील जाहीर करणे योग्य नाही, असे सांगितले. मात्र मावळे कोण आहेत हे जनता जाणते, असे नमूद केले.

जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी मंत्र्यांना वाटून दिली आहे, ती पार पाडली जाईल असे सांगून, शिवसेनेला बाहेरून उमेदवार आयात करण्याची गरज नाही. आमचे सैनिक कडवे मावळे आहेत, असे ते म्हणाले. मुंबईत भाजपच्या चढाईपूर्ण धोरणाचा फटका बसेल काय, या प्रश्‍नावर ते म्हणाले, की मुंबईकरांना कोणत्याही संकटात शाखा मदत करते. वस्ती तेथे शाखा ही शिवसेनेची ओळख आहे. त्यामुळे मुंबईकर मराठी तसेच अमराठी कोणताही गाजावाजा न करता संकटात मदत करणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील, अशी आम्हाला खात्री आहे.

Web Title: divakar ravate talking