यंदा दिवाळी प्लॅस्टिकमुक्त करा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

रस्त्यांसाठी प्लॅस्टिक वापर
स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा झालेले प्लॅस्टिक २०० किलोमीटर अंतरावरील सिमेंट कंपन्यांनी घेऊन जाण्यास सहमती दर्शविली आहे. प्रक्रिया न होऊ शकणारे प्लॅस्टिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते तयार करताना वापरावे, अशा सूचनादेखील शासनाने केल्या आहेत.

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यंदा तीन टप्प्यांत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्याचे आदेश राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मोहिमेत प्लॅस्टिकचा कचरा जमा केला जाणार असून, या कचऱ्याचे पुनर्वापर (रिसायकल) करून विल्हेवाट लावत प्लॅस्टिकमुक्त दिवाळीकडे वाटचाल करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. त्यानुसार शहरांसह ग्रामीण भागातही स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. मानांकन दिले जात आहे. यंदा स्वच्छ भारत अभियानाला पाच वर्षे पूर्ण होत असल्यामुळे तीन टप्प्यांत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

११ सप्टेंबर ते एक ऑक्‍टोबरदरम्यान जनजागृती केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दोन ऑक्‍टोबरला श्रमदान चळवळ राबविली जाणार आहे. तीन ते २७ ऑक्‍टोबरदरम्यान प्लॅस्टिक गोळा करून, त्याची रिसायकल करून विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्लॅस्टिकमुक्त दिवाळी म्हणून साजरी करण्याकडे वाटचाल करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

नियंत्रण अधिकाऱ्याची होणार नियुक्ती
मोहिमेत सर्व शासकीय कार्यालये, बिगर सहकारी संस्था, रहिवासी संस्था, व्यापारी संघटनांना सहभागी करून घेण्यात यावे. संपूर्ण शहर बंदी असलेल्या प्लॅस्टिकपासून मुक्त करावे. जमा झालेल्या प्लॅस्टिकची वर्गवारी करून पुनर्प्रक्रिया केंद्रावर साठा करून ठेवावा. पुनर्प्रक्रिया शक्‍य नसलेले प्लॅस्टिक कंपन्यांना देण्यात यावे. या कार्यक्रमासाठी एका अधिकाऱ्याची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Plasticfree Swatch Bharat Abhiyan