सोलापुरात ‘डीजे’ला बंदीच; ‘डीजे’ला परवानगी नाहीच; पोलिस दोनदा मोजणार आवाज: ग्रामीण पोलिसांनी मंडळांना दिली ‘नो डीजे नो डॉल्बी’ची शपथ, वाचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिन, माता रमाई आंबेडकर जयंती सर्वांनी उत्साहात साजरी केली. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व मंडळांनी आवाजाची मर्यादा पाळली. आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या आवाजाची मर्यादा पाळूनच साजरी करण्याची ग्वाही मध्यवर्ती मंडळांच्या विश्वस्तांनी दिली आहे.
solapur city police

solapur city police

sakal

Updated on

सोलापूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन, माता रमाई आंबेडकर जयंती सर्वांनी उत्साहात साजरी केली. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व मंडळांनी आवाजाची मर्यादा पाळली. आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या आवाजाची मर्यादा पाळूनच साजरी करण्याची ग्वाही मध्यवर्ती मंडळांच्या विश्वस्तांनी दिली आहे. डीजे कोणीही वाजवणार नाही, विश्वस्तांचा शब्द मोडणार नाही, याची खबरदारी सर्व मंडळांनी घ्यावी. आम्ही मिरवणुकीच्या सुरवातीला आणि रात्री आठ-साडेआठच्या सुमारास आवाज मोजणार आहे. त्यावेळी मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कारवाई होईल, असे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी स्पष्ट केले.

बुधवारी (ता. ८) पोलिस आयुक्तालयात सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व शांतता कमिटी सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, विजय कबाडे, गौहर हसन, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, बाळासाहेब वाघमारे, आनंद चंदनशिवे, गौतम चंदनशिवे, रॉकी बंगाळे, दशरथ कसबे, अजित गायकवाड, पिंटु ढावरे, सिद्धेश्वर पांडगळे, सचिन शिराळकर, बबलू गायकवाड, नागेश इंगळे, लौकिक इंगळे, कांत उघडे, राज भोसले, पप्पु गायकवाड, पंकज ढसाळ, संजय पोळ, दीपक गवळी, आशुतोष नाटकर, के. डी. कांबळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील वीज बंद, रस्त्यांवरील वीजेच्या तारा, रस्त्यांलगतची झाडे यावर प्रश्न उपस्थित केले. त्यावर अधिकाऱ्यांनी अडथळे मिरवणुकीपूर्वी हटविण्याची ग्वाही दिली.

‘सीपीं’नी सांगितली बाबासाहेबांची आठवण

भारत स्वातंत्र्य झाल्यावर मतदानाचा हक्क कोणाला असावा, यावर चर्चा सुरु असताना इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनाच मतदानाचा हक्क राहावा, असा विचार पुढे आला. पण, डॉ. बाबासाहेबांनी त्याला विरोध करीत देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क असावा, अशी भूमिका मांडली आणि तो हक्क मिळवूनही दिला. या महामानवाची जयंती एका समाजापुरती मर्यादित राहू नये. कोणाच्या आनंदात अडथळा आणणे आमचा उद्देश नाही, पण कायद्याचे उल्लंघन होऊ नये. इतरांना त्रास होईल अशी लेझर लाईट लावू नका, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार साऊंडचा आवाज असावा, १६ तारखेला मिरवणूक मार्गाची पाहणी करू, मिरवणूक मार्गाला जोडणारे पॉईंट कमी करुन विविध भागातून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना ठरावीक मार्गावरुनच आणले जाईल, मिरवणुकीच्या तयारीसाठी वाहने रस्त्यांलगत उभी करू शकता पण वाहतुकीला अडथळा होऊ नये, सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी प्रत्येक मंडळांनी ठरावीक वेळेनंतर आपली वाहने पुढे न्यावीत, मिरवणूक मार्गावर पोलिस बंदोबस्त राहील, असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले.

‘डीजे’ हा इगोचा विषय नाहीच, उज्वल भविष्य हेच आमचे स्वप्न

विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंती उत्सवात ‘डीजे’ हा इगोचा विषय नाहीच. आठ-दहा दिवसांची ओली बाळंतीनसुद्धा बाबासाहेबांची जयंती मिरवणूक पहायला तेवढ्याच उत्साहात येते, हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे उच्चशिक्षणातून चांगले करीअर हेच तरुणांचे स्वप्न आहे. आम्ही ‘बेसिक्स’तर्फे ११ एप्रिल रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात ‘निळी टोपी’ नाटक सादर करतोय. पोलिस आयुक्तांचे त्यासाठी मार्गदर्शन लाभले. सर्व तरुणांनी शिकावे, उच्चशिक्षित होऊन चांगले करिअर करावे, असे आवाहन अनुराग सुतकर याने यावेळी केले.

शांतता कमिटीच्या बैठकीत ‘नो डीजे’ची शपथ

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात आज झालेल्या शांतता कमिटी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलिसांनी सर्वांना ‘नो डीजे, नो डॉल्बी’ची शपथ दिली. बुधवारी (ता. ८) ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयातील संवाद हॉलमध्ये जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेखाली, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले, ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला व शाळकरी मुलांच्या शारीरिक व मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढावी. गणेशोत्सवापासून सुरू असलेली ही बंदी यापुढेही कायम लागू असणार आहे. त्यामुळे कोणी विनापरवाना डीजे लावल्यास, ध्वनीमापक यंत्राद्वारे ध्वनीची पातळी मोजली जाईल. ध्वनी प्रदूषणाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या मंडळांवर व डीजेवाल्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई

गणेशोत्सवापासून आतापर्यंत सर्वच जयंती-उत्सवांत कोणीही डीजे लावलेला नाही. पूर्णपणे डीजेमुक्त झालेला सोलापूर जिल्हा पहिला आहे. ज्या मंडळांनी ‘डीजे’ लावला, त्याचा आवाज मोजला जाईल. आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या मंडळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com