esakal | संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास.....!; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay rathod

"संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान नको, अन्यथा..."

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चर्चेत आलेले माजी मंत्री संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनाला दिला आहे. राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलतना त्यांनी हा इशारा दिला.

पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नये तसं झाल्यास त्यांनी आंदोलनाला तोंड देण्यासाठी तयार रहावं. पूजा राठोड मृत्यूप्रकरणी पुढे काहीच झालं नाही. महाराष्ट्रात अडचण अशी आहे की, कुठल्याही विषयाचा शेवट होत नाही. खूप विषय आपल्याकडे प्रलंबित आहेत. यामध्ये कुणी जामिनावर बाहेर, तर कुणी इतर कोणत्या कारणांसाठी बाहेर." संजय राठोड यांना राजीनामा द्यायला लावल्यानंतर पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं पुढं काय झालं? असं विचारताना ही केस हायकोर्टात चालवा, अशी मागणीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

काय आहे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण?

टिकटॉक व्हिडिओजच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली तरुणी पूजा चव्हाण हिनं या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर हे प्रकरण विरोधकांनी लावून धरलं होतं. भाजपने यावरून आक्रमक होत राज्यभरात निदर्शने केली होती. या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करत भाजपने कारवाईची मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राठोड यांना पदावरून दूर व्हावं लागलं होतं. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी राठोड यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

loading image