तुम्हाला माहितीयं आपट्याला सोनं का म्हणतात? शेतकऱ्यांसह कफ-पित्त, पोटचे विकार अन्‌ जखमांचे व्रणही बरे करणारा आपटा

आपटा ही बहुगुणी औषधी वनस्पती असून त्याची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. आपट्याला ‘अश्मंतक’ म्हणूनही ओळखले जाते.
apta
aptasakal

सोलापूर : आपटा ही बहुगुणी औषधी वनस्पती असून त्याची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. आपट्याला ‘अश्मंतक’ म्हणूनही ओळखले जाते. दगडाचा, खडकाचा नाश करणारा. तसेच मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा वृक्ष देखील म्हणतात. धन्वंतरीने ‘निघण्टू’मध्ये आपट्याचे औषधी उपयोग विशद केले आहेत.

आपट्याच्या झाडाची बहुगुणी पंचसूत्री...

१) पित्त-कफ दोष दूर होईल

आपट्याची पाने पित्त आणि कफदोषांवर गुणकारी आहेत. दाह, तृष्णा आणि प्रमेहावर आपट्याची पाने उपयोगी ठरतात. आपट्याची पाने शुष्क असल्यामुळे त्यांचा रस निघत नसल्यामुळे ती पाण्यात घालावी व ओली करून वाटून घ्यावी. त्या रसात त्याच प्रमाणात दूध व साखर टाकावी आणि तयार काढ्याचे दिवसातून चार-पाच वेळा सेवन करावे. यामुळे लघवीची जळजळ थांबण्यास मदत होते.

---------------------------------------------

2) जखम भरण्यास मदत

त्वचेवर कोणत्याही ठिकाणी जखम झाल्यास किंवा व्रण उठल्यास त्यावर आपट्याची साल बांधण्याचा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. आपट्याच्या सालीचा काढा थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध टाकून सेवन करावा. त्यामुळे जीर्ण व्रण बरे होतात.

------------------------------------------------

३) पोटाच्या विकारांवर रामबाण औषध

आपट्याच्या पानाबरोबरच बियाही तितक्याच उपयोगी आहेत. बियांचे बारीक चूर्ण करून ते गाईच्या तुपात घोटून त्याचे मलम तयार करावे. कीटकांचा दंश झालेल्या ठिकाणी लावल्यानंतर बरे वाटते. आपट्याच्या बीयुक्त घृताचे सेवन केल्यास कृमी शौचावाटे बाहेर पडतात. मधाबरोबर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण १० ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.

-------------------------------------------------------

४) गालगुंड व कंठरोग होईल बरा

गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाल्यास आपट्याच्या सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून घ्यावा. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालावा. तसेच गंडमाळेवर आपट्याची साल बांधावी. हा उपाय केल्यास गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होतात.

--------------------------------------------------------

५) विंचवाचे विष उतरण्यास मदत

शरीरावर विंचू चावल्यास त्यावरून आपट्याची शाखा फिरवायला सांगितले जाते. तसे केल्यास विंचवाचे विष उतरते. पण, तरीही अशा घटनांमध्ये हॉस्पिटलमध्ये जाणे योग्यच. तसेच आपट्याच्या मुळाची साल ही हृदयाची सूज कमी करण्यास मदत करते. आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळावी व ते मिश्रण गाळून प्यावे. हा उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जुन घ्यावा.

शेतकऱ्यांसाठी आपटा सोनंच

आपट्याचे झाड शेतीतील, बांधावरील सोनं आहे. आपटा जिथे लावला जातो, तेथील माती भुसभुशीत व सुपीक बनते. मातीचा कस वाढतो. जमिनीतील खडक, दगड भेदून जमीन पोकळ करते. आपट्याचे झाड द्विदलीय असल्यामुळे त्याच्या मुळावर गाठी असतात. या गाठी जमीन सुपीक करण्यासाठी उपयुक्त असतात. जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढवण्याचे कामही गाठी करतात. त्यामुळेच ‘संस्कृत’मध्ये आपट्याला अश्मंतक व वनराज असे नाव आहे. खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते.

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण। इष्टानां दर्शनं देही कुरू शत्रुविनाशनम्॥

आयुर्वेदातील या श्लोकानुसार, आपटा हे महावृक्ष अनेक महादोषांचे निवारण करते. इष्ट (देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो. आपटा तुरट, मधुर आणि आंबट रसाचा असून गुणांनी लघु आणि शीत वीर्याचा आहे. त्याची पाने, साल, शेंगा, फुले, मूळाचा उपयोग होतो. मधुमेह आणि विविध मूत्रविकारासाठी आपटा वापरला जातो. मूत्रवाटे पडणारी खर, मुतखड्याच्या व्याधी बऱ्या होतात. आपटा, तीळ, मंजिष्ठा व शतावरीचा दुसऱ्या महिन्यातील गर्भस्त्राव टाळण्यास वापरतात, असे शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयातील औषधी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विद्यानंद कुंभोजकर यांनी सांगितले.

आपट्याचे पौराणिक महत्त्व

प्रभू श्रीरामाचे पूर्वज दानशूर रघुकुल राजाचे शासन असताना वरतंतू नावाचे श्रेष्ठ ऋषी होते. त्यांच्याकडील कौत्स्य नामक शिष्याने १४ विद्यांमध्ये नैपुण्य मिळविले. गुरुदक्षिणा घ्यावी, असा आग्रह केल्यावर वरतंतू मुनींनी १४ विद्या म्हणून १४ कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या. दानशूर रघुराजाकडे कौत्स्याने याचना केली व राजाने कुबेराकडून आपट्याच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव घडविला. कौत्स्याने प्रामाणिकपणे त्यातील १४ कोटी मुद्रा गुरूंना दिल्या. त्यावेळी आपट्याच्या वृक्षावरील शिल्लक मुद्रा राजाने संपूर्ण प्रजेला घरी न्यायला सांगितल्या. हा दिवस दसऱ्याचा होता आणि तेव्हापासून दरवर्षी आपट्याची पाने वाटण्याची प्रथा रूढ झाली, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com