esakal | पवारांवर वेबसीरीज केली तर कोट्यवधींची कमाई होईल; सोमय्यांचा खोचक टोला
sakal

बोलून बातमी शोधा

kiriti somaiya ajit pawar

पवारांवर वेबसीरीज केली तर कोट्यवधींची कमाई होईल; सोमय्यांचा खोचक टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनामी कंपन्यांचे स्तर उभे करून जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीत गैरव्यवहार केला. तसेच, पवार यांनी सेबीने प्रतिबंधित केलेल्या यश-व्ही-जेवेल्स या शेल कंपनीद्वारे मनी लाँडरिंग करून काळ्याचे पांढरे केले,’ असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ‘ठाकरे- पवार सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. महाराष्ट्राला घोटाळेबाज नेत्यांपासून मुक्त करणे हे आमचे लक्ष्य आहे,’ असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांचे संचालक, नातेवाइकांच्या घरी आणि मुंबईतील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते. त्यावर पवार यांनी ‘माझ्या नातेवाइकांचा काही संबंध नसताना त्यांच्या घरी छापे टाकून भाजप हीन दर्जाचे राजकारण करीत आहे,’ अशी टीका पवार यांनी केली होती.

याप्रकरणी सोमय्या यांनी पुन्हा पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरंडेश्वर कारखान्याचा राज्य सहकारी बॅंकेने लिलाव केला. त्यावेळी हा कारखाना गुरू कमोडिटी सर्विसेस या कंपनीला विकला गेला. या कंपनीने हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स या कंपनीला लीजवर दिला. जरंडेश्वर शुगर मिल्सचे खरे मालक लपविण्यासाठी पवार यांनी विविध कंपन्यांचे स्तर उभारले.

जरंडेश्वर शुगर मिल्सचे सर्वाधिक ९०.५० टक्के शेअर्स स्वत:च्या स्पार्कलिंग सॉइल कंपनीचे आहेत. त्या कंपनीचे मालक संस्थापक अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. पवार आणि त्यांच्या परिवाराची ५७ कंपन्यांमध्ये नामी-बेनामी संपत्ती आहे. पवार याचे अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार आहेत. त्यापैकी यश-व्ही-जेवेल्स ही एक शेल कंपनी आहे. २००९ मध्ये सेबीने प्रतिबंधित केलेली ही बोगस कंपनी आहे. या कंपनीतून ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांनी मनी लाँडरिंगमधून काळ्याचे पांढरे केल्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. या सर्व गैरव्यवहाराचा अहवाल आपण उच्च न्यायालयाला देणार आहोत, असे सोमय्या यांनी सांगितले.

हेही वाचा: DC vs KKR Live: दिल्लीला पहिला धक्का; पृथ्वी शॉ माघारी

नेटफ्लिक्सने वेब सीरीज केली तर कोट्यवधींची कमाई

पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील देशातील प्राप्तीकर विभागाची सर्वांत मोठी ‘रेड’आहे. त्यावर नेटफ्लिक्सने वेब सीरीज करायचे ठरविल्यास अजित पवारांना दोनशे-तीनशे कोटींची रॉयल्टी मिळेल, अशी खोचक टीका सोमय्या यांनी केली.

तर माझीही चौकशी करा...

‘माझ्यावर आरोप करण्यापेक्षा पवार परिवाराने घोटाळ्याचे उत्तर द्यावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा चार्टर्ड अकाउंटंट एकच आहे. मी गैरव्यवहार केला असेल तर राज्यात तुमचेच सरकार आहे. त्याची चौकशी करावी,’ असे आव्हानही सोमय्या यांनी दिले.

loading image
go to top