चार न्यायाधीशांसह एका वकिलावर हुंडाबळी व दरोड्याचा गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 22 जून 2018

केळापूर जि. यवतमाळ येथे कार्यरत असलेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शेख वासीम अक्रम शेख जलाल यांचे लग्न गुलअफशार या महिलेसोबत 11 डिसेंबर 2016 रोजी झाले होते. लग्नानंतर काही दिवस संसार ठीक चालला पण नंतरच्या काळात त्रास सुरू केला. 

नांदेड : पत्नीचा छळ करणाऱ्या चार न्यायाधीशांसह एका वकिलाविरूध्द हुंड्यासाठी त्रास देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दरोडा टाकणे या गुन्ह्यांतर्गत इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील तक्रारदार महिलेचे वडील काही दिवसांपूर्वीच जिल्हा न्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

केळापूर जि. यवतमाळ येथे कार्यरत असलेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शेख वासीम अक्रम शेख जलाल यांचे लग्न गुलअफशार या महिलेसोबत 11 डिसेंबर 2016 रोजी झाले होते. लग्नानंतर काही दिवस संसार ठीक चालला पण नंतरच्या काळात त्रास सुरू केला. शेख वासीम अक्रम यांची पत्नी गुलअफशार यांचे वडील त्यावेळी जिल्हा न्यायाधीश होते.
पती-पत्नीचे भांडण मिटवून सरळ मार्गी जीवन असा प्रयत्न सुरू झाला. पण त्या प्रयत्नाला अपयश आल्यानंतर २१ जून रोजी गुलअफशार यांनी याबाबत तक्रार दिली. त्यात त्यांनी गाडी खरेदी करण्यासाठी ४ लाखांची मागणी व इतर साहित्यांसाठी मिळून ११ लाख ५० हजारांची मागणी हुड्यांपायी केली. तसेच माझे लाखो रूपयांचे साहित्य बळजबरीने चोरून नेले असे सांगितले. 

याप्रकरणी इतवारा पोलिसांनी 3 न्यायाधीश, 1 न्यायाधीश निवड झालेला व्यक्ती, 1 वकील, 2 महिला अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामध्ये लावण्यात आलेली भारतीय दंड विधानाची कलमे ३९५, ४९८, (अ), १२० (ब), ३५४, ५०६, ५०४ आणि ३४ अशी आहेत. इतवाराचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर सोळंके करत आहेत.

Web Title: Dowry and robbery case against a lawyer with four judges