डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उंचीवरून वाद 

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उंचीवरून वाद 

मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उंचीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली असतानाच दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उंचीवरूनही नव्याने वाद सुरू झाला आहे. या संदर्भात राज्य सरकारला जाब विचारण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले. 

दादरच्या इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे; तसेच गुजरातमधील नर्मदा धरणावर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. 

सुरवातीला शिवाजी महाराज यांच्या स्मारक आराखड्यात छत्रपतींच्या स्मारकाची उंची वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकापेक्षा जास्त होती. मात्र 15 जून 2018 रोजी केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवले आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठीची उंची 160 मीटरऐवजी 126 मीटर करण्यात आल्याचे सांगितले आहे. वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाची उंची 157 मीटर असल्याने सरकारने जाणीवपूर्वक छत्रपतींच्या स्मारकाची उंची कमी केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. हा वाद अद्याप संपलेला नसताना डॉ. आंबेडकर यांच्या स्मारक उंचीचा नवा विषय समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उंची 350 फूट ठेवण्याची मागणी याआधी करण्यात आली होती. मात्र आता नव्या आराखड्यानुसार पुतळ्याची उंची 251 फूट; तर खालचा चौथरा 99 फूट होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आराखड्याचा आज आढावा घेतला असता, ही बाब समोर आली. 

सरकारला जाब विचारणार 
आंबेडकरी समाजात या निर्णयाबाबत मोठी नाराजी असून, याप्रकरणी सरकारला जाब विचारणार असल्याचे आठवले यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातूनही बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक असेल, असे सांगण्यात येत होते. मग आता त्याचे काय झाले, असा प्रश्न आंबेडकरी अनुयायी उपस्थित करत आहेत. 

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष 
स्मारकाच्या आढावा बैठकीत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारला याबाबत जाब विचारला जाईल, असे आठवले म्हणाले होते. यामुळे मोठा संघर्ष उद्भवण्याची शक्‍यता आहे. सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com