अवजड वाहतुकीमुळे नाशिक रस्त्यावर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर, कळंब, नारायणगाव व राजगुरुनगर येथे दररोज सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कंटेनर व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. दिवसा अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घातल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. 

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर, कळंब, नारायणगाव व राजगुरुनगर येथे दररोज सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कंटेनर व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. दिवसा अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घातल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. 

चाकण व भोसरी औद्योगिक वसाहतीमुळे पुणे-नाशिक रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सरासरी २५ हजाराहून अधिक वाहने रस्त्यावरून जातात. उन्हाळ्याच्या लागलेल्या सुट्या व लग्नसराईमुळे वाहनांची संख्या रस्त्यावर दुपटीने वाढली आहे. अवजड वाहनांची दिवसांची संख्या ५ हजारांहून अधिक आहे. 

नारायणगाव येथे वारुळवाडी, बाजार समिती, बस स्थानक, मंचर येथे बस स्थानक, पिंपळगाव फाटा, राजगुरुनगर येथे बाजार समिती, बसस्थानक, पोलिस ठाणे भीमा नदीवरील पूल ते टोलनाका या मार्गावर वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक आहे. राजगुरुनगर आगाराच्या पश्‍चिमेला ब्रिटिश कालावधीत बांधलेला पूल अपुरा पडत आहे. तसेच, बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी गाड्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीत भर टाकतात. पुलाजवळच ३० ते ४० फूट खोल दरी आहे. पुलालगत पश्‍चिम व दक्षिण बाजूला संरक्षित भिंत नसल्याने वाहनांना अपघाताचा धोका असल्याचे प्रवाशांनी सांगितले.  

रहदारीच्या मार्गावरच होत असलेल्या वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होण्यासाठी बाह्यवळणाची कामे लवकर करावीत. ही कामे पूर्ण होईपर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कंटेनर व अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी पोलिसांनी घालावी. त्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

बाह्यवळणाची कामे रखडली
राजगुरुनगर, मंचर व कळंब येथे अजून बाह्यवळणाचे काम झाले नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. वाहनांचा वेग कमी होतो. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. राजगुरुनगर ते नारायणगाव या रस्त्यालगत १५ मंगल कार्यालये आहेत. वऱ्हाडी मंडळींच्या दुचाकी व चार चाकी गाड्या बेशिस्तीने रस्त्याच्या लगतच लावलेल्या असतात. लग्न समारंभ संपल्यानंतर लगेचच रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी वाहनचालकांची चढाओढ सुरू असते.

Web Title: Due to heavy traffic on the Nashik road