देशातील १३१ किल्ल्यांवर दुर्गपूजा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

माले - शिवाजी ट्रेल, विविध दुर्ग संवर्धक संघटनांच्या माध्यमातून रविवारी (ता. २४) देशभरातील १३१ पेक्षाही जास्त किल्ल्यांवर एकाचवेळी दुर्गपूजा करण्यात आली. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दमण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, गोवा आदी राज्यांतील किल्ल्यांवर दुर्गपूजा पार पडली. दुर्गसंवर्धक सघटनांच्या या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये नोंद होणार आहे.

दुर्गसंवर्धनाचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा साम्राज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांचा सहभाग हे या वर्षीच्या दुर्गपूजेचे वैशिष्ट्य ठरले. दुर्गप्रेमींसह सुमारे ५० किल्ल्यांवर ८० विविध सरदार घराण्यांच्या वंशजाच्या हस्ते दुर्गपूजा झाली. पुणे जिल्ह्यातील राजगड, शिवनेरी, तोरणा, घनगड, तिकोना, पुरंदर, मल्हारगड, शनिवारवाडा, भोरगिरी, सिंहगड आदी किल्ल्यांवर मोठ्या उत्साहात दुर्गपूजा पार पडली. घोरपडे, शिरोळे, कंक, बलकवडे, गरुड, पेशवे, पोतनीस, देसाई, जगताप, निंबाळकर, धुमाळ, मारणे, ढमाले, मोहिते, घाटगे आदी सरदार वंशजांच्या हस्ते दुर्गपूजा झाली. तसेच, परदेशांतील सोहार (ओमान), यॉर्क (कॅनडा), डेट्रॉईट (युनायटेड स्टेट्‌स), सिलोसो (सिंगापूर) येथेही किल्ल्यांवर दुर्गपूजा झाली. 

घनगड (ता. मुळशी) येथे कर्नाटकचे गिरीशराजे घोरपडे व रोहितराजे घोरपडे सरकार मुधोळकर यांच्या हस्ते मारुती मंदिरात दुर्गपूजा झाली. एकोले ग्रामस्थांनी घोरपडे सरकार यांचे स्वागत केले. घनगड संवर्धन समितीचे अध्यक्ष भानुदास कदम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. हिस्टरी क्‍लबचे माजी अध्यक्ष राहुल जाधव यांनी दुर्गवाचन केले. किल्ल्यावर झालेली संवर्धन कामांची पाहणी करण्यात आली. नाना कदम, बाळू कदम, मारुती कदम, लहू कदम आदी उपस्थित होते.

संपूर्ण भारतभर १३१ पेक्षाही जास्त किल्ल्यांवर, तसेच परदेशातील ४ किल्ल्यांवर दुर्गपूजा करण्यात आली. दुर्गसंवर्धनाच्या या उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये होणार आहे.
 - मिलिंद क्षीरसागर, संस्थापक, शिवाजी ट्रेल

Web Title: Durgpooja on 131 fort india book of records