ई लर्निंग आणि ई स्कूल प्रकल्पावर भर देणे आवश्‍यक - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई - राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. माहिती व तंत्रज्ञानाची कास धरत येणाऱ्या काळात ई लर्निंग आणि ई स्कूलसारखे प्रकल्प राबविण्यावर शालेय शिक्षण विभागाने अधिकाधिक भर द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक वर्षा निवासस्थानी आज झाली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री या वेळी म्हणाले, 'जानेवारी 2016 मध्ये फक्त 10 हजारहून अधिक शाळा डिजिटल झाल्या होत्या. आता जून 2018 अखेर 63 हजार 500 हून अधिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. असे असले तरी येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना ई लर्निंग आणि ई स्कूल यांसारख्या सोयी मिळाव्यात. यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

शाळांतील शैक्षणिक गुणवत्तावाढीकरिता प्रगत शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून, याअंतर्गत विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम, जलदगतीने शिक्षण, अध्ययन स्तर अशा उपक्रमांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता किती आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.

Web Title: E-Learning and E-School Project Chief Minister