कृषी क्षेत्रातील शिक्षणासाठी कमवा व शिका योजना

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासन व इस्राईल यांच्या माध्यमातून कमवा व शिका योजना सुरू करून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याबाबत विचार करण्यात येत आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली.

मुंबई - महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासन व इस्राईल यांच्या माध्यमातून कमवा व शिका योजना सुरू करून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याबाबत विचार करण्यात येत आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली.

येणारे वर्ष भारत आणि इस्राईल यांच्यातील संबंधांचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्त या दोन्ही देशांतील कृषी क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात या वेळी परदेशी शिष्टमंडळाने फुंडकर यांच्यासोबत चर्चा केली. महाराष्ट्र-इस्राईल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सेंटर ऑफ एक्‍सलन्सची संख्या वाढविणे आणि अस्तित्वात असलेल्या सेंटर ऑफ एक्‍सलन्सचा विस्तार करणे याबाबत या वेळी चर्चा झाली.

इस्राईलकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून विदर्भामध्ये सीताफळ संशोधन प्रशिक्षण कार्याला गती द्यावी, असे फुंडकर यांनी सांगितले. राज्यातील महानगरामध्ये सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी शेतीसाठी वापरण्याबाबत इस्रायली तंत्रज्ञानाचे सहकार्य आवश्‍यक आहे. तसेच राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये इस्राईलच्या सहकार्यातून कृषिविषयक प्रकल्प राबवणे, तसेच खारपानपट्टयामध्ये क्‍लायमेट रेझिलियंट तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

नाफेडमार्फत तूर खरेदी
राज्यात तुरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ झाल्याने नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या फुंडकर यांच्या मागणीला केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. फुंडकर यांनी आज त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून चर्चा केली. याबाबत माहिती देताना फुंडकर म्हणाले, की यंदाच्या खरिपात तुरीचे उत्पन्न वाढण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा सुमारे 23 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्षेत्रावर तुरीची लागवड वाढल्याने उत्पादनात 47 टक्‍क्‍यांनी वाढ होणार असून, 12.50 लाख मेट्रिक टन तूर उत्पादन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Earn and Learn program in the field of agricultural education