सावकारी फास आवळला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई - सततचा दुष्काळ, शेतमालाचा पडलेला भाव यामुळे राज्यात सावकारी फास अधिकच आवळला आहे. परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जात यंदा दुप्पट वाढ झाली आहे. त्यातच राज्य सरकारकडून नवे परवाने देण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्याच्या 2016-17 या वर्षाच्या आर्थिक पाहाणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

परवानाधारक सावकारांकडून 2015 मध्ये 894 कोटी रुपये घेण्यात आले होते. 2016 मध्ये एक हजार 549 कोटींचे कर्ज घेण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र, ही आकडेवारी फक्त परवानाधारक सावकारांची असून, ग्रामीण भागात खासगी सावकरांकडून घेतलेले कर्ज याहून अनेक पटीने अधिक असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. 2013 मध्ये 655 कोटींचे कर्ज सावकारांनी दिले होते. दोन वर्षे सलग पडलेला दुष्काळ, यंदा पाऊस चांगला झाला तरी शेतीला योग्य भाव न मिळाल्याने कर्जाचे प्रमाण वाढले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 2013 मध्ये राज्यात 10 हजार 607 परवानधारक सावकार होते. 2016 पर्यंत ही संख्या 12 हजार 208 वर पोचली आहे. 

ग्रामीण भागातील सावकार जमीन व इतर मालमत्ता गहाण ठेवल्यास मासिक कमीत कमी दीड टक्के व्याजाने कर्ज देतात. काहीच गहाण न ठेवल्यास तीन टक्के व्याजाने कर्ज मिळते. हे कर्ज वेळेत न फेडल्यास त्यावरील व्याज वाढत जाते, त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येते. 2015 मध्ये सावकारीचे एक हजार 589, तर 2016 मध्ये एक हजार 947 नवे परवाने देण्यात आले आहेत. 

Web Title: Economic Survey report