प्रफुल्ल पटेल यांना ईडीची नोटीस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 जून 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या 6 जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या 6 जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील खरेदी प्रकरणात खासगी दलाल दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने या घटनेचा निषेध केला असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. 

लोकसभा निवडणुकीच्या विदर्भातील प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहार जेलमधील एका व्यक्तीमुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची झोप उडाल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी या वेळी संबंधित नेत्याचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख प्रफुल्ल पटेल यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. अखेर ही शक्‍यता खरी ठरल्याचे आजच्या घटनेवरून स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वी दीपक तलवारला दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. यूपीए सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असताना दीपक तलवार सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याचा ईडीचा आरोप आहे. या काळात दीपक तलवार याने परदेशी हवाई कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केले होते. यामुळे एअर इंडिया कंपनीचे मोठे नुकसान झाले होते.

याशिवाय, अन्य एका प्रकरणात "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबिलिटी'साठी राखून ठेवण्यात आलेले 90 कोटी रुपये हडप केल्याचा आरोपही दीपकवर आहे. या सगळ्या प्रकरणांचा सध्या "ईडी'कडून तपास सुरू आहे. यूपीए सरकारच्या काळातही हवाई क्षेत्रासंदर्भात झालेल्या व्यवहारांमध्येही दीपक तलवारची भूमिका असल्याचा संशय "ईडी'ला आहे. याप्रकरणी दीपकवर भ्रष्टाचार आणि कर चुकवेगिरीच्या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

काय आहे प्रकरण? 
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग दीपक तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला 2008-09 या कालावधीत 272 कोटी रुपये मिळाले होते. सरकारी नियमानुसार परदेशात प्रवासी सेवा देण्यासाठी विमान कंपनीकडे पाच वर्षांचा अनुभव आणि 20 विमाने असणे बंधनकारक आहे. तलवारने या नियमांना फाटा देऊन सरकारी अधिकारऱ्यांना लाच देऊन "एअर एशिया'ला परदेशात प्रवासी वाहतुकीसाठी परवाना मिळावून दिल्याचा आरोप आहे.

या व्यवहारामुळे एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका बसला होता. हे सर्व व्यवहार प्रफुल्ल पटेल यांच्या कारकिर्दीत झाले होते. या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थिती नसताना 70 हजार कोटी रुपये किमतीच्या 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणुकीतून प्रशिक्षण संस्था सुरू करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे अशा चार प्रकरणांचा ईडीकडून तपास सुरू आहे. 

भाजप सुडाचे राजकारण करत आहे. या नोटिशीला पटेल योग्य उत्तर देतील. सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न पटेल यांच्यामुळे साकार झाले. तसेच, त्यांनी विमान वाहतूकमंत्री म्हणून घेतलेले निर्णय व्यक्‍तिगत नव्हते तर मंत्रिगटाने घेतले होते. 
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED summons Praful Patel