राज ठाकरे अडकणार 'ईडी'च्या कचाट्यात?

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

- कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असल्याने ईडीच्या रडारवर. 

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे, याबाबतची माहिती ईडीच्या सूत्रांकडून देण्यात आल्याचे फ्री प्रेस जर्नलने सांगितले. त्यानुसार, कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळेच ते सध्या ईडीच्या रडारवर आहेत.

राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे नुकतीच भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे. भाजपच्या गोटातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर आता कोहिनूर मिल क्रमांक 3 विक्री प्रकरणात राज ठाकरे यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणातूनच राज ठाकरे यांना ईडीकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

'ईडी'कडे चौकशीसाठी लवकरच बोलावले जाणार

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजप यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांच्या या भाषणांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडू नये, यासाठी त्यांना दबावात ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता त्यांना वारंवार ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED Will Action on MNS Chief Raj Thackeray Soon