गुरुजी आठवड्यातून दोनदाच शाळेत जाणार; शिक्षण विभागाकडून नवी नियमावली जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात येणार नाही. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शिक्षकांना कोणतेही निर्देश देता येणार नाहीत.

मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू न करता केवळ शैक्षणिक वर्ष सुरू केले. मात्र लॉकडाउन संपल्यानंतरही शिक्षकांना आठवड्यातून केवळ दोन वेळाच शाळेत उपस्थित राहावे लागेल. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला. 

राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याचे नियोजन आणि ऑनलाइनलर्निंग संदर्भात मुख्याध्यापकांना शिक्षकांना आठवड्यातून दोन वेळा शाळेत बोलविता येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्याची तयारी करावी लागेल. महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलविण्यात येणार नसून, जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीने कामे देण्यात येणार आहेत. शिक्षकांना शाळेत बोलविण्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी नियोजन करत एकाचवेळी सर्व शिक्षक गोळा होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या शाळांचे कोरोना विलगीकरण कक्षामध्ये रूपांतर करण्यात आले आहे अशा शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात येणार नाही. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शिक्षकांना कोणतेही निर्देश देता येणार नाहीत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना ड्यूटीपासून मुक्तता 
राज्यातील अनेक शिक्षकांना कोरोना सर्वेक्षण आणि इतर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. शिक्षकांना या जबाबदारीमधून मुक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले. यासंदर्भात स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याने कोरोना ड्यूटी असणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे 

अतिरिक्त शिक्षकांची मदत 
विद्यार्थी पट कमी झाल्याने मुख्य शाळेतून अन्य आस्थापनेवर पाठविण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत बोलावून ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी त्यांची मदत घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education announces new regulations teacher goes to school twice a week