esakal | उन्हाळ्याच्या सुट्ट्या 1 मेपासून; शिक्षण विभागाने केलं स्पष्ट

बोलून बातमी शोधा

school

उन्हाळ्याच्या सुट्ट्या 1 मेपासून; शिक्षण विभागाने केलं स्पष्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे- राज्यातील सर्व शासकीय, अशासकीय आणि सैनिकी शाळांना शनिवारपासून (ता.१) उन्हाळी सुट्टी लागू केली आहे. ही सुटी १३ जूनपर्यंत असणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) १४ जूनपासून सुरू होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उन्हाळ्याची सुटी कधी लागणार, या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे.

वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण, एप्रिल महिना संपत आला तरीही शाळांचे (ऑनलाइन) वर्ग सुरू होते. मात्र, शिक्षण विभागाने उन्हाळ्याची सुटी जाहीर केली नसल्याने मुख्याध्यापकांना शाळा सुरू ठेवल्या होत्या. आता शिक्षण विभागाने अधिकृतरित्या सुटी जाहीर केल्या आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी यात सुसूत्रता यावी, म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार ही सुटी जाहीर केली आहे. विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात १४ जूनला शाळा सुरू होतील, तर विदर्भातील तापमानाचा विचार करता तेथील शाळा २८ जूनासून सुरू होतील, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: ‘वंचितांची शाळा’; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणाची अनोखी समाजसेवा!

‘‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये सध्या बंद आहेत. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोरोनाच्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश येतील, असं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप म्हणाले.