esakal | शाळा सुरू करण्यास राज्यातील 81 टक्के पालकांचा होकार !
sakal

बोलून बातमी शोधा

School

शाळा सुरू करण्यास राज्यातील 81 टक्के पालकांचा होकार !

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

शहरी भागातील पालकांचा शाळा सुरू होण्याकडे अधिक, तर त्याखालोखाल ग्रामीण भागातील पालकांचा ओढा दिसत आहे.

माळीनगर (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) (Maharashtra State Council for Educational Research and Training) राज्यात शाळा सुरू करण्याबाबत केलेल्या सर्व्हेमध्ये सहा लाख 90 हजार 820 पालकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 81 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास होकार दर्शविला आहे. शहरी भागातील पालकांचा शाळा सुरू होण्याकडे अधिक, तर त्याखालोखाल ग्रामीण भागातील पालकांचा ओढा दिसत आहे. निमशहरी भागातील पालक फारसे उत्सुक नसल्याचे आकडेवारीवरून दिसते. (Eighty-one percent of parents in the state are positive about starting a school-ssd73)

हेही वाचा: पंढरपूरच्या प्रांताधिकारी पदासाठी फिल्डिंग !

कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविडमुक्त गावातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अनेक पालक, शिक्षक शाळा कधी सुरू होणार याबाबत वारंवार विचारणा करत होते. त्यासाठी एससीईआरटीने पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतले होते. सोमवारी (12 जुलै) रात्री 11:55 पर्यंत ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पालकांना विविध प्रश्न विचारून शाळा सुरू करण्याविषयी त्यांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये शाळा कोणत्या भागात आहे, कोरोनाच्या नियमांचे पालन केल्यास पालक आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यास तयार आहेत का, आदी प्रश्न विचारण्यात आले. मुंबईतील एक लाख 10 हजार, पुणे जिल्ह्यातील 73 हजार 838, सातारा जिल्ह्यातील 41 हजार 233, ठाणे जिल्ह्यातील 39 हजार 221, अहमदनगर जिल्ह्यातील 34 हजार 67 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 30 हजार 437 पालकांनी प्रामुख्याने यामध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा: केंद्रीय विद्यालयात पहिल्या वर्गात प्रवेशाची अधिसूचना !

एकीकडे कोविडमुक्त गावात 15 जुलैपासून शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश, त्यासाठी सर्वेक्षणातून पालकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भूमिका यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच ग्रामीण भागासोबत शहरी भागातील शाळा सुद्धा लवकरच सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी सूतोवाच केले आहे. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली आहे. शासन स्तरावरच राज्यातील सर्व शाळांसाठी एकमुखी निर्णय होण्याची गरज आहे.

शाळेच्या भागनिहाय पालकांचा सहभाग

 • शाळेचा भाग : सर्वेक्षणात सहभागी पालक : टक्केवारी

 • ग्रामीण : 240799 : 34.85

 • निमशहरी : 86399 : 12.51

 • शहरी : 363642 : 52.64

 • एकूण : 690820

इयत्तानिहाय पर्याय नोंदवलेले पालक-

 • इयत्ता : पालक संख्या : टक्केवारी

 • नर्सरी : 19273 : 2.79

 • पहिली-पाचवी : 162184 : 23.48

 • सहावी-आठवी : 215590 : 31.21

 • नववी-दहावी : 286990 : 41.54

 • अकरावी-बारावी : 105392 : 15.26

 • मुलांना शाळेत पाठविण्यास तयार असलेले पालक : पाच लाख 60 हजार 818 (81.18 टक्के)

 • मुलांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसलेले पालक : एक लाख 30 हजार 2 (18.82 टक्के)

loading image