एकनाथ खडसे राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

खडसे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर पक्षांतराच्या वाटेवर असल्याचे संकेत अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. खडसे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्याबाबत विचार सुरू असून, अद्याप निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खडसे यांच्यासह भाजपमधील काही नाराज नेते राष्ट्रवादी, शिवसेनेच्या संपर्कात असल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत प्रवेश केल्यास एकनाथ खडसे मंत्री होतील, तसेच भाजपमधील नाराज नेत्यांनाही ते सोबत घेऊन जातील, अशी शक्‍यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अपमानाची एकही संधी सोडली नाही. वारंवार अपमान होत असल्याने आपण वेगळा विचार करू, असा अल्टिमेटमही खडसे यांनी पक्षाला दिला होता. दिल्लीत सोमवारी पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, तो वेळही खडसे यांना दिला नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडसे भेटणार आहेत. ते अशोक चव्हाण यांच्याही संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा :  पंकजा मुंडेंचा 'स्वाभिमान'; जागा झाला; केले नवे ट्विट

राष्ट्रवादीने धनंजय मुंडे, छगन भुजबळ या बाहेरून आलेल्या नेत्यांनाही सन्मानाने वागविले आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत गेल्यास त्यांना मंत्रिपदही मिळू शकते. खडसेंच्या मदतीने भाजपला खिंडार पाडणे राष्ट्रवादीला शक्‍य होऊ शकते. शिवसेनेलाही अनुभवी आणि अभ्यासू नेत्याची उणीव भासतेय, त्यामुळे शिवसेनाही खडसे यांच्यासाठी चांगली जागा निर्माण करू शकते. खडसे यांचे समर्थक माजी आमदार उदेसिंग पाडवी, धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटे हेदेखील राष्ट्रवादी अथवा शिवसेनेत जाऊ शकतात. माजी मंत्री दिलीप कांबळे यांनाही खडसेंनी आग्रह केल्यास ते पक्षांतर करू शकतात. शिरपूरमधील भाजपचे जितेंद्र ठाकूर यांनी याआधीच राष्ट्रवादीत प्रवेश निश्‍चित केला आहे.

हेही वाचा : पायाभूत प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उद्धव ठाकरे ​

खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. एकनाथ खडसे यांच्या स्नूषा रक्षा खडसे यांच्यावरही पक्ष सोडण्याची वेळ आल्यास रावेरमधून पुन्हा निवडून येण्याची क्षमता रक्षा यांच्यात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse can join NCP or Shiv Sena