शिवसेना प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचे वक्तव्य; म्हणाले...

वृत्तसंस्था
Thursday, 28 November 2019

- एकनाथ खडसे यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

मुंबई : राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव घेतले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून पायउतार व्हावे लागल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. त्यानंतर आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होत आहे. त्यापूर्वी एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, त्याबाबतचे वृत्त खुद्द एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील फडणवीस-2 सरकार कोसळल्यानंतर एकनाथ खडसे यांनी काल (बुधवार) पक्षाला घरचा आहेर दिला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटे कापल्याने विश्वासात न घेतल्यानेच भाजपला सत्ता गमवावी लागली, असे अप्रत्यक्षपणे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. तसेच भाजपने सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर 25 जागा वाढल्या असत्या, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. 

राज्यात आजपासून उद्धव सरकार

शिवसेना प्रवेशाबाबत एकनाथ खडसे म्हणाले, मी भाजपमध्ये असून, शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आजच्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यांनी निमंत्रण दिलं आहे.

आदित्य ठाकरेंची भेट

एकनाथ खडसे यांनी काल (बुधवार) शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करणार का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला होता. मात्र, आता एकनाथ खडसे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse statement about Shivsena Party Join Issue