
Sangli :...अखेर न्याय मिळणार; जत तालुकासंदर्भात CM शिंदेंची मोठी घोषणा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या उफाळून आलेला असताना कर्नाटकनं महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलं आहे. अशातच जत तालुकासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. (Eknath Shinde big announcement Sangli taluka Maharashtra Karnataka Border issue )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊले उचलत जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः जत तालुक्यातील ग्रामस्थांची भेट घेतली. तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये आम्ही 2 हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याचे आश्वासन दिलं.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
रात्री दीड वाजता जतमधील लोक आले होते. त्यांनी जत तालुक्याचा नकाशा आणला होता यावेळी नकाशावर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. आम्ही तुमच्यासाठी 2 हजार कोटींचं टेंडर काढत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवण्याचं काम करतोय. जतमधील जे 40-50 गावे आहेत त्यांना पाणी मिळायला हवं. या विषयावर बाकीचे लोकं राजकारण करत असतील तर त्यांना करु द्या. त्यांच्या राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन एवढंच मी सांगतोय असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद मागच्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. परंतु सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याला पाणी नसल्याने कर्नाटक सरकारने तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांना पाणी देऊन महाराष्ट्र सरकारला एकप्रकारे आव्हान दिले आहे.
यापूर्वी, बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केला होता. तसेच त्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही कर्नाटकचाच भाग असल्याचेही सांगितलं. यामुळे महाराष्ट्रा आणि कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा जोरदार उपस्थित झाला.