एकनाथ शिंदे बंडातील डोंबिवली कनेक्शन; सुरत, गुवाहाटी- गोवा प्रवासात BJP आमदाराची साथ

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे SAKAL

Maharashtra Political Crisis

डोंबिवली : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत डोंबिवली भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण हे देखील आहेत. सुरतहून गुवाहाटी तेथून गोवा आणि त्यानंतर आता मुंबईच्या प्रवासात आमदार चव्हाण हे शिंदे यांच्यासोबत सावलीसारखे फिरत आहेत. यामुळे शिंदे आणि चव्हाण यांच्या मैत्रीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 20 जूनला बंडखोरी केल्यानंतर डोंबिवलीतील भाजपचे आमदार चव्हाण हे देखील तेव्हापासून नॉट रिचेबल होते. सूरतमधून बंडखोर आमदार गुवाहाटी येथे रवाना झाले त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, संजय कुटे सोबत असल्याची माहिती पुढे आली. आजही आमदार चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल येत असून ते शिंदे यांच्यासोबत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. याविषयी डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते काहीही बोलण्यास तयार नसून आमदार आऊट ऑफ आहेत केवळ एवढेच सांगत आहेत. (Eknath Shinde News)

भाजपा शिवसेना युतीच्या काळात विधानसभा, लोकसभा निवडणूक आणि महापालिका निवडणूकीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांनी मैत्रीचे संबंध जपत एकमेकांना साथ दिली आहे. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तर रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून ठाणे, डोंबिवली पट्ट्यात नेहमीच संघ आणि भाजपचा प्रभाव दिसून आला आहे. आनंद दिघे यांनी हिंदूत्वाचे आक्रमक राजकारण करत भाजपच्या ताब्यात असलेल्या लोकसभा, विधानसभेच्या जागा शिवसेनेने खेचून घेतल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनाच मोठी कशी राहील याची दक्षता घेतली होती. दिघे यांच्यानंतर शिंदे यांच्या खांद्यावर शिवसेनेची धुरा आली.

त्यांनी पक्षाचा प्रभाव कमी होऊ दिला नाही. मात्र संघ विचारसरणी असलेल्यांशी संबंध उत्तम कसे राहतील याची पुरेपुर काळजी त्यांनी घेतली. शिवसेना भाजपा युतीच्या काळात जागा वाटप अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचा वाटा देताना शिंदे यांनी भाजपा फारसा दुखावला जाणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसून आले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत हे ठाण्यात आले असताना शिंदे यांनी त्यांचा सत्कार करीत भेट घेतली होती. भाजप, संघ परिवाराशी त्यांनी नाते घट्ट पकडून ठेवलेले आहे. लोकसभा निवडणूकीच्या वेळेस खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीत चव्हाण यांच्यावर प्रचारसभा, नियोजनाची जबाबदारी सोपवून एकनाथ हे अन्य उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त असायचे. (Dombivli MLA Ravindra Chavan)

निवडणूकांमध्ये भाजपा शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढली असतानाही आमदार चव्हाण यांना डोंबिवलीतील शिवसैनिकांचा छुपा पाठींबा राहीला आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आगामी निवडणूका लक्षात घेता शिवसेनेने आमदार चव्हाण यांच्याविरोधी भूमिका घेत विकास कामावरुन त्यांना लक्ष केले होते. मात्र तरीही चव्हाण हे शिंदे यांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेत नसत, सूचक विधान करत ते वेळ मारुन नेत असत. थेट शिंदेवर प्रतिक्रीया का देत नाहीत असे प्रसार माध्यमांनी विचारताच ते शिंदे हे आमचेच असल्याचे हसून सांगत असत. या घडामोडी लक्षात घेता डोंबिवलीचे भाजपाचे आमदार चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले असून शिंदे यांना भाजपाकडे वळविण्यात शिंदे यांचाही मोठा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

आमदार चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून चव्हाण यांच्यावर ही मोठी जबाबदारी त्यांनी सोपविली होती. चव्हाण यांनी ही जबाबदारी चोखपणे पार पाडल्याने आता फडणवीस सरकारच्या मंत्रीमंंडळात चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com