
एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती
Eknath Shinde: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री; साध्या शिवसैनिकाचा प्रवास
देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करत सर्वांनाच धक्का दिलाय. शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी विराजमाना व्हावा, हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते आणि गुरुवारी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एकनाथ शिंदेंचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपदाचा प्रवास जाणून घेऊया...
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. या आधी २०१४ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.
२०१९च्या सुरुवातीपासून त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८०च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज मुख्यमंत्रीपदापर्यंत ते पोहोचले आहेत. (Life Story of Eknath Shinde)
२० व्या वर्षी एकनाथ शिंदे राजकारणात (Eknath Shinde Political Journey)
एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. (Eknath Shinde Biography)
आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे.
सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. (CM Eknath Shinde News)
हेही वाचा: एकनाथ शिंदे बंडातील डोंबिवली कनेक्शन; सुरत, गुवाहाटी- गोवा प्रवासात BJP आमदाराची साथ
आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यावर पुन्हा शिक्षणाला सुरूवात
गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली.
सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. आता ते एमए करत आहेत.
परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
१९९७ मध्ये नगरसेवकपदी
सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली.
सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले.
सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले.
Web Title: Eknath Shinde Journey Rickshaw Driver Shakha Pramukh Shiv Sena Maharashtra Chief Minister
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..