Thackeray Vs Shinde : ठाकरेंशी लढायला शिंदे गट ठाकरेंनाच पुढे करणार? सेनेच्या नव्या पुतण्याची एंट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Nihar Thackeray
Thackeray Vs Shinde : ठाकरेंशी लढायला शिंदे गट ठाकरेंनाच पुढे करणार? सेनेच्या नव्या पुतण्याची एंट्री

Thackeray Vs Shinde : ठाकरेंशी लढायला शिंदे गट ठाकरेंनाच पुढे करणार? सेनेच्या नव्या पुतण्याची एंट्री

शिवसेना, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एकेकाळचं सर्वात शक्तिशाली नाव. एक काळ तर असा होता की राज्यात सत्ता कोणाचीही असो, शब्द फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचाच चालायचा. बाळासाहेबांच्या शब्दापुढे जाण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. प्रबोधनकार ठाकरेंपासून सुरू झालेला निर्भिडपणाचा वारसा पुढच्या पिढ्याही जपण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र हीच शिवसेना आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढतेय. एकेकाळी स्वतःच कोर्ट असलेली शिवसेना आपल्या अस्तित्वासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहे. अशावेळी या ठाकरे परिवारानं पाया रोवलेल्या शिवसेनेला वाचवण्यासाठी मात्र ठाकरे एकत्र नाहीत. पक्षातल्या बंडातली गोष्ट लांबची...पण ठाकरेंही एकत्र नाहीत. हा मुद्दा आत्ता उपस्थित होण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे ठाकलेले त्यांचे पुतणे.

हेही वाचा: Maharashtra Politics : CM शिंदे दिल्लीला गेले; जाताना लेकाला राज्याचा कारभार देऊन गेले?

आता उद्धव ठाकरेंचे पुतणे ...तेही विरोधातले. हे म्हणताच साहजिकच तुमच्या डोळ्यापुढे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचाच चेहरा आला असेल. मात्र हे समीकरण एवढं सोपं नाही. शिवसेनेतली, विशेषतः ठाकरे परिवारातली नाराजी केवळ राज आणि उद्धव इतकीच मर्यादित नाही. त्यात आता उद्धव ठाकरेंचे सख्खे भाऊ आणि बाळासाहेब ठाकरेंचा मोठा मुलगा बिंदूमाधव यांचीही एन्ट्री झालीय. बिंदूमाधव आता हयात नाहीत. मात्र त्यांचा मुलगा निहार याने या वादात आता उडी घेतली आहे. त्यामुळे ठाकरे परिवारातले मतभेद आता केवळ राज उद्धव इतकाच मर्यादित राहिलेला नाही. कोण आहेत हे निहार ठाकरे? त्यांच्या भूमिकेला एवढं महत्त्व का? त्याचे काय परिणाम होतील? या सगळ्याविषयी जाणून घ्या.

हेही वाचा: Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात ठाकरे परिवार हुकुमाचा एक्का बाहेर काढणार? नव्या पोस्टरची चर्चा

निहार ठाकरे सगळयात आधी चर्चेत आले ते म्हणजे त्यांच्या लग्नामुळे. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची काँग्रेसमध्ये असलेली कन्या अंकिता ही निहार ठाकरेंची बायको. इथूनच निहार ठाकरे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच्या ठळकपणे समोर आले. त्यानंतर मात्र त्यांनी ठाकरेंमधल्या अंतर्गत वादाला हवा दिली. एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी, जेव्हा अगदी जुने जाणते, बाळासाहेबांच्या काळापासून पक्षात असलेले नेते शिंदे गटाच्या बाजूने जात होते. तेव्हाच बाळासाहेबांच्या या नातवानेही शिंदेंची साथ द्यायचं ठरवलं आणि आपल्या काकांना साथ सोडली. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी ठाकरे परिवाराने एकत्र यावं, अशी आशा जनतेला लागून राहिलेली असतानाच राज ठाकरेंनी तर शिंदेंची साथ दिलीच, पण निहार ठाकरेही शिंदे गटात गेले. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या शिंदे ठाकरे वादाच्या सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीवेळीही त्यांनी ही लढाई शिंदे गटच जिंकणार अशी प्रतिक्रिया दिली आणि बाळासाहेबांच्या या नातवाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे शिवसेनेतल्या राज - बाळासाहेब या काका पुतण्याच्या नाराजीनाट्यानंतर आता ठाकरे परिवारात आणि शिवसेनेत नवे नाराज ठाकरे काका पुतणे समोर येतायत. ते म्हणजे निहार आणि उद्धव.

हेही वाचा: Eknath Shinde : निवडणूक आयोगातील लढाई शिंदेच जिंकणार; बाळासाहेबांच्या नातवाला विश्वास

आता थोडं मागे जाऊ आणि राज ठाकरेंच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नात्याविषयी जाणून घेऊ. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातले भावनिक बंध सगळ्या महाराष्ट्राला माहित आहेत. नव्या पिढीनेही बाळासाहेबांच्या निधनानंतर राज ठाकरेंना त्यांच्या आठवणीत अनावर झालेले अश्रू पाहिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्याही काही मुलाखती पाहिल्या तरी लक्षात येईल. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेले बाळासाहेब ठाकरेही उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. राज ठाकरेंनीही शिवसेनेवर उद्धव ठाकरेंवर प्रचंड टीका केली, अजूनही करतात. पण त्यांनी कधीच बाळासाहेबांना, त्यांच्या कोणत्याही परंपरेला धक्का पोहोचू दिला नाही. थेट बाळासाहेब ठाकरेंवर राज ठाकरेंनी कधीही टीका केली नाही. अजूनही राज हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार अशाच चर्चा राज्यभरात घुमत आहेत. त्यामुळे राज आणि बाळासाहेब हे काका पुतणे परस्परविरोधी असले, तरी त्यांनी आपल्यातलं भावनिक नातं कायम जपलं, राज ठाकरे ते अजूनही जपतायत.

हेही वाचा: Eknath Shinde : नेता फक्त पदाने नाही, कर्तृत्वाने मोठा होतो; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोला

पण निहार ठाकरेंची गोष्ट वेगळी आहे. एरवी शिवसेनेत फारसे लक्ष घालत नसलेले निहार ठाकरे मात्र शिवसेनेतल्या बंडावेळी समोर आले. शिवसेनेचा पाय खोलात असताना निहार ठाकरेंनी आपल्या सख्ख्या काकांची साथ न देता, पक्षातून वेगळे झालेल्या शिंदे गटाचा हात पकडला आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. नुकतीच ठाकरे विरुद्ध शिंदे अशी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. त्यामध्येही शिंदे गटच जिंकणार, असं म्हणत निहार ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची बाजू घेतली आहे. या सगळ्यामुळे आता निहार ठाकरे हे राज्याच्या राजकारणातला एक महत्त्वाचा खेळाडू ठरणार, हे निश्चितच.

आता निहार ठाकरेंच्या शिंदे गटाला पाठिंबा देण्यामुळे कोणती राजकीय समीकरणं साध्य होतील, कोणती बदलतील, याबद्दलही जाणून घेऊ. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतले अनेक वरिष्ठ आणि शक्तिशाली नेते शिंदेंच्या बाजूने गेले. शिवसेनेतल्या ५४ पैकी ४० च्या वर आमदार आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे ठाकरेंकडचं संख्याबळ साहजिकच कमी आहे. त्यात आता आपल्याकडे असलेल्या बहुमताच्या जोरावर आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गट करू पाहतोय. कोर्टात याचा काहीही निर्णय होऊ दे, पण शिवसेनेचा मतदार भावनिक आहे. त्यामुळे त्यांना ठाकरे या आडनावाविषयीच जास्त प्रमाणात सहानुभुती आहे. त्यामुळे शिंदे गटाला ठाकरे आडनावाशिवाय ग्राऊंड लेव्हलवर आपलं अस्तित्व टिकवणं अवघड आहे. त्यासाठीच शिंदे गटाची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी त्यांनी सॉफ्ट टार्गेट म्हणून आधीच उद्धव ठाकरेंवर नाराज असलेल्या राज ठाकरेंना गळाला लावलेलं आहे. राज ठाकरेंनी भाजपासोबत जात शिंदे गटालाही पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरेंनी धावून जावं, अशी भावनिक लाट एका गटात असली, तरीही राज ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचीच सावली आहेत, असे मानणारे कमी नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंच्या 'ठाकरे' असण्यानं शिंदे गटाला आधीच फायदा होणार आहे. त्यात आता आणखी एक ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचा सख्खा नातूच शिंदेंच्या बाजूने आल्याने शिंदे गटाला आणखी एक भावनिक धागा सापडला आहे.

निहार ठाकरेंचा बाळासाहेबांवर तेवढाच अधिकार आहे, जेवढा आदित्य ठाकरेंचा. शिवसेनेच्या बाजूने, पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी त्याच तुलनेचं युवा आणि आक्रमक नेतृत्व शिंदे गटालाही हवं आहे. शिवाय आता शिवसेना तेजस ठाकरेंनाही लाँच करण्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटालाही तसा तोडीस तोड पर्याय उभा करणं भाग आहे. अशातच जर बाळासाहेब ठाकरेंचे सख्खे नातूच आपल्या सोबत असतील, तर हा सामना आणखी अटीतटीचा होईल आणि शिंदे गटाची जिंकण्याची शक्यता वाढेल. तसं म्हटलं तर शिंदे गटात उल्लेखनीय असं युवा नेतृत्व नाही. म्हटल्यास श्रीकांत शिंदे आहेत, पण त्यांचा फारसा प्रभाव अद्याप महाराष्ट्राच्या जनतेवर झालेला नाही. त्यामुळे निहार ठाकरे यामध्ये शिंदे गटाचं एक प्रभावी अस्त्र ठरणार आहे. याचा आता शिंदे गट कसा वापर करतोय, ठाकरे विरुद्ध शिंदे ही लढाई ठाकरे विरुद्ध ठाकरे, अशी तर होणार नाही ना, हे सगळं येणारा काळच ठरवेल. पण निहारच्या निमित्ताने शिवसेनेला काका पुतण्या लाभत नाहीत, हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.