अन्य धर्मीयांचा अनादर करणार नाही - एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde speech in vidhansabha about balasaheb thackeray anand dighe and shivsena mumbai

अन्य धर्मीयांचा अनादर करणार नाही - एकनाथ शिंदे

मुंबई : ‘‘सत्तेचा फायदा तळागाळातील जनतेला करून देण्याबरोबरच अन्य धर्मीयांचा अनादर होणार नाही. सूडबुद्धीने काम न करता सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मर्यादा सोडणार नाही, परंतु एका मर्यादेपलीकडे गेल्यास सहनही करणार नाही,’’ अशा शब्दांत तुफान टोलेबाजी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

विधानसभेत सोमवारी विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर आभार व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी हे सरकार काम करणार असून सर्वसामान्यांना आपले वाटेल असे हे सरकार आहे, असे स्पष्ट करतानाच विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री झाले भावुक

गेले १५ दिवस चाललेल्या या राजकीय नाट्यामध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या. शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली. याबाबत तपशीलवार माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. संयत परंतु आक्रमक भाषणात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगांची आठवण करून देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही क्षण भावुक झालेले पाहायला मिळाले.

लढेन, मरेन, पण मागे हटणार नाही

‘‘पदाच्या लालसेपोटी मी कधीही काम केले नाही. शिवसेना वाचवण्यासाठी मी एकटा शहीद झालो तरी चालेल. मी लढेन आणि मरेन, पण मी मागे हटणार नाही. राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान माझ्याशी खालच्या दर्जाची वागणूक मिळाली. माझे बाप काढण्यात आले,” या सर्व गोष्टी या बंडामागे आहेत,’’ असे शिंदे यांनी सांगितले.

गद्दारी आमच्या रक्तात नाही

‘‘ पक्षात नाराजी असल्याचे किमान पाच वेळा पक्षप्रमुखांना पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मी कालही शिवसैनिक होतो, आजही आहे आणि उद्याही असेन. त्यामुळे मी गद्दारी केलेली नाही. गद्दारी आमच्या रक्तात नाही,’’ असे त्यांनी निक्षून सांगितले.

बंडामागे फडणवीसच

पंधरा दिवसांच्या बंडाविषयी सांगताना शिंदे म्हणाले, की आमचे लोक जेव्हा झोपायचे तेव्हा मी फडणवीस यांना भेटायचो आणि भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चा व्हायची. कारण राजकारणात हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विचारधारेशी जुळतात. भाजप-शिवसेना या अगोदरही अनेक वर्षे युती राहिलेली आहे. आपल्या बंडामागचे मोठे कलाकार फडणवीस असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

विरोधकांचा समाचार

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार कोणी काढून घेतला. त्यामुळे हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या पक्षांसोबत कसे बसायचे हा मोठा प्रश्न होता

  • अजित पवार यांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी मी त्यांना काही बोललो नाही. त्यांनी ८०० कोटी रुपये घेतले तरी मी काही बोललो नाही. मात्र, तुम्ही समांतर नगरविकास खात्याचा प्रमुख का केला, याचे उत्तर काय?

  • एकीकडे माझ्याकडे बोलण्यासाठी माणसं पाठवली आणि दुसरीकडे माझ्यावर दूषणे लावत मला पदावरून हटविण्यात आले. घरावर दगड मारण्याची भाषा केली, पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा अजून पैदा झाला नाही.

Web Title: Eknath Shinde Speech In Vidhansabha About Balasaheb Thackeray Anand Dighe And Shivsena Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..