जनता मला गुणवत्तेवर निवडून देते; नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election news Nitin gadakari statement People elect me On quality politics mumbai

जनता मला गुणवत्तेवर निवडून देते; नितीन गडकरी

मुंबई : ‘‘पुढच्या निवडणुकीत मी कटआऊट लावणार नाही, लावूही देणार नाही. मते द्या अथवा नका देऊ, जनता मला गुणवत्तेवर निवडून देते आणि जनतेला हे सर्व कळते. त्यामुळे सर्व दृष्टीने गुणात्मक काम करणे हा चांगला मार्ग आहे. प्रत्येक कामात गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे, ’’ रोखठोक वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अंधेरी येथे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट) पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महापालिका, नगरपालिका आदींच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. यामध्ये प्रशासकीय सेवक, नगरसेवक, आमदार या सगळ्यांचा सहभाग लाभला तर अनेक कामे नीट होतात.

‘‘प्रत्येक महापालिकेत घाण पाणी असते. त्याचा वापर करून त्यांनी उत्पन्न मिळवले पाहिजे. शहरी विभागात काम करण्यासाठी जगातील तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संस्था एकत्र आल्या पाहिजेत. तंत्रज्ञान आणि गुणवत्ता याचा मेळ घातल्यास त्यातून गुणात्मक बदल घडू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारमुक्त कारभार करता येऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले.

तबला, बासरीची धून

आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेचा विकास केला पाहिजे. यासाठी कचरा वाहून नेणारे ट्रक हे इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर असावेत. वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी आपण वाहनांचे हॉर्न बदलणार असून यापुढे कर्णकर्कश आवाजातील हॉर्नऐवजी त्यातून तबला, बासरी यांचे आवाज कसे येतील, हे पाहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.