राज्यात वीजसंकट

Electricity
Electricity

चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर्षांतील सर्वांत कमी कोळसासाठा
नागपूर - राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच कोळशाअभावी चार वीजसंच बंद करण्याची वेळ महानिर्मितीवर ओढवली आहे. कोळशाच्या कमतरतेने उर्वरित संचांमधूनही  मर्यादित वीजनिर्मिती होत आहे. वीजप्रकल्पांमधील कोळसासाठा गेल्या पाच वर्षांतील निच्चांक पातळीवर पोहोचला आहे. ही स्थिती राज्यावर वीजसंकट घोंगावत असल्याचे संकेत देणारी आहे.

दिवाळीसाठी घरांवर रोषणाई करण्यात आली आहे. त्यातच शेती आणि उद्योगांकडून विजेची मागणी वाढली आहे. सुट्या संपून कार्यालये आणि शाळा महाविद्यालयेसुद्धा सुरू झाल्याने  राज्यात विजेच्या मागणीचा आलेख उंचावला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास विजेची मागणी १९ हजार ३६३ मेगावॉट नोंदविली गेली. महानिर्मितीच्या प्रकल्पामधून ५ हजार ६०० मेगावॉट तर अन्य प्रकल्पांमधून ५ हजार ५०० मेगावॉट वीज उपलब्ध झाली.  केंद्राकडून ७ हजार मेगावॉट वीज खरेदी करून मागणी व पुरवठ्यातील तफावर दूर करण्यात आली. 

मागणी अधिक असताना कोळश्‍याअभावी विविध प्रकल्पांमधील पाच वीजसंच बंद ठेवण्याची  वेळ महानिर्मितीवर ओढवली आहे. खापरखेडा येथील संच क्रमांक १, कोराडी संच क्रमांक ७, भूसावळ संच क्रमांक ३, पारस संच क्रमांक ३ अपुऱ्या कोळशामुळे बंद ठेवावे लागले. एक ते तीन दिवस पुरेल एवढाच कोळसासाठा वीजकेंद्रांमध्ये उपलब्ध असल्याने अन्य संचांनाही फटका बसला असून मर्यादित स्वरूपात वीजनिर्मिती करावी लागत आहे. 

दुष्काळाचाही फटका
राज्यात दुष्काळी स्थिती आहे. धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने जलविद्युत निर्मितीवरही परिणाम झाला आहे. सरदार सरोवर प्रकल्पाची क्षमता ३९१ मेगावॉट असली तरी अपुऱ्या पाण्यामुळे प्रत्यक्षात १३ मेगावॉटच वीजनिर्मिती होते आहे. राज्यात जलविद्युतची एकूण स्थापित क्षमता ३०३० मेगावॉट असताना प्रत्यक्षात ३३३ मेगावॉट वीजनिर्मितीपर्यंतच मजल गाठता येत आहे.

उपलब्ध साठा
कोराडी - अडीच दिवस
खापरखेडा - २ दिवस
चंद्रपूर - साडेतीन दिवस
पारस - ३ दिवस
भुसावळ - दीड दिवस
परळी - १ दिवस
नाशिक -१ दिवस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com