अकरावीच्या अभ्यासक्रमात पुन्हा बदल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

राज्यातील प्रवेश परीक्षांची रचना
राज्यातील सध्याच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमध्ये मागे पडतात. अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रीय प्रवेश परीक्षांच्या अनुषंगाने परीक्षा आराखड्यात बदल केले आहेत. येणारी पुस्तकेही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा नजरेसमोर ठेवून करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. त्याचा भविष्यात विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

औरंगाबाद - इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात गेल्या पाच वर्षांत तीन वेळा बदल करण्यात आला आहे. वर्ष 2019-20 या नवीन शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या अभ्यासक्रमात पुन्हा बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडणार असून, परीक्षा आणि गुणांवर निश्‍चितच परिणाम होणार आहे. राष्ट्रीय प्रवेश परीक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

याआधी अकरावीचा अभ्यासक्रम 2012-13 आणि 2013-14 या दोन वर्षांत बदलण्यात आला होता. लागोपाठ बदल केल्यानंतर फक्त पाच वर्षांचे स्थित्यंतर या अभ्यासक्रमाला प्राप्त झाले होते. आता पुन्हा आगामी शैक्षणिक वर्षापासून 2019-20 मध्ये अकरावीची नवी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. एकूणच दहावीत घोकंपट्टी करून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुन्हा एकदा नव्या अभ्यासक्रमाला सामोरे जाणार आहेत. वर्ष 2018-19 या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. नवीन अभ्यासक्रम, बोर्डाच्या नवीन नियमानुसार परीक्षेत बदल करण्यात आला होता; त्यामुळे यंदा दहावीच्या निकालात कमालीची घट झाली होती. आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अकरावीला नवीन अभ्यासक्रमाला तोंड द्यावे लागणार आहे. सलग दोन वर्षे नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा या वर्षीही चांगलाच कस लागणार आहे.

शिक्षण तज्ज्ञांच्या मते बदल गरजेचा
दहावीची पुस्तके बदलल्यानंतर त्याच्या पुढील वर्षी अकरावीची पुस्तके बदलणे आवश्‍यक असते. जेणेकरून दोन्ही पुस्तकांच्या रचना, आराखडे यातील तफावत भरून निघेल. त्याचप्रमाणे पाच वर्षांत पुस्तके बदलणे आवश्‍यक आहे. दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी अद्ययावत झालेल्या असतात. त्याचा समावेश पुस्तकांमध्ये होणे गरजेचे असते, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Syllabus Changes Education